नालेसफाईचा फज्जा? ओढ्यातील गाळ रस्त्यावरच; सातवनगरकरांचा संताप

नालेसफाईचा फज्जा? ओढ्यातील गाळ रस्त्यावरच; सातवनगरकरांचा संताप

मना न्यूज नेटवर्क

हडपसर ,

पुण्यातील सातवनगर परिसरात कै. अॅड. गेणुजी सातव चौक ते स्वामी विवेकानंद औद्योगिक सोसायटी या मार्गालगत असलेल्या ओढ्याची साफसफाई करण्यात आली असली, तरी ओढ्यातून काढलेला गाळ रस्त्यावरच टाकून ठेवण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी हा गाळ उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावली गेली नाही, तर तो पुन्हा पावसाच्या पाण्यासोबत ओढ्यात जाऊन साचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महापालिकेकडून नालेसफाई आणि पावसाळी पूर्वतयारीसाठी सुमारे १ कोटी रुपयांचे टेंडर मंजूर करण्यात आले आहे. या कामांसाठी ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट कार्यपद्धती (SOP) दिलेली असते. त्यामध्ये नाले व ओढ्यांमधून काढलेला गाळ तातडीने उचलून अधिकृत ठिकाणी नेण्याची अट असते. मात्र प्रत्यक्षात गाळ अनेक दिवस रस्त्यावरच पडून असल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

स्थानिक नागरिक अर्जुन सातव यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “कोट्यवधी रुपयांची कामे मंजूर होतात, SOP तयार होतात, पण त्याची अंमलबजावणी कोण करणार? देखरेख करणारे अधिकारी नेमके काय करतात?” असा सवाल त्यांनी केला.

समस्या

  • ओढ्यातून काढलेला गाळ रस्त्यावरच पडून आहे.
  • पावसाचे पाणी आल्यास हा गाळ पुन्हा ओढ्यात वाहून जाण्याची शक्यता.
  • नालेसफाईच्या कामाचा उद्देशच निष्फळ होण्याचा धोका.
  • दुर्गंधी, डासांची वाढ आणि आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता.
  • रस्त्यावर वाहतूक आणि पादचाऱ्यांना अडथळा.

नागरिकांच्या मागण्या

  • रस्त्यावर टाकलेला गाळ तातडीने उचलण्यात यावा.
  • गाळाची अधिकृत ठिकाणी वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावावी.
  • संबंधित कामाची प्रत्यक्ष पाहणी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
  • नालेसफाईच्या टेंडरमधील अटी व SOP चे पालन झाले का याची चौकशी करावी.
  • भविष्यात अशा प्रकारची निष्काळजीपणा होऊ नये यासाठी जबाबदारी निश्चित करावी.

“ओढ्यातील गाळ काढल्यानंतर तो काही काळ सुकण्यासाठी बाजूला ठेवला जातो. मात्र पावसाळ्यापूर्वी तो उचलून त्याची नियमानुसार विल्हेवाट लावली जाईल. नागरिकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन संबंधित विभागाकडून पाहणी करण्यात येईल.”

— सुचिता पानसरे, सहाय्यक आयुक्त,येवलेवाडी उंड्री क्षेत्रीय कार्यालय

सातवनगर परिसरातील नागरिकांनी उपस्थित केलेले प्रश्न केवळ एका ओढ्यापुरते मर्यादित नाहीत, तर महापालिकेच्या नालेसफाई कामांच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत. करदात्यांच्या पैशातून कोट्यवधी रुपये खर्च होत असताना प्रत्यक्षात कामे किती प्रभावीपणे होत आहेत, याचे उत्तर प्रशासनाला द्यावे लागणार आहे. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना रस्त्यावर पडून असलेला गाळ तातडीने हटवून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!