काळेपडळ पोलिसांची कारवाई; तीन दुचाकी, रिक्षा ,पाच मोबाईल हस्तगत

काळेपडळ पोलिसांची कारवाई; तीन दुचाकी, रिक्षा ,पाच मोबाईल हस्तगत

हडपसर

काळेपडळ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने वाहनचोरी आणि मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून तब्बल ४ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई काळेपडळ पोलिसांच्या तपास पथकाने केली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांचा तपास सुरू असताना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार तपास पथकाने सापळा रचून संबंधित बालकाला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने वाहन आणि मोबाईल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.

या कारवाईत पोलिसांनी तीन दुचाकी, एक रिक्षा तसेच पाच मोबाईल फोन असा एकूण ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त केलेल्या वाहनांमध्ये होंडा ड्रीम दुचाकी, निळ्या रंगाची स्प्लेंडर मोटारसायकल आणि रिक्षेचा समावेश आहे. तसेच विविध कंपन्यांचे मोबाईल फोनही हस्तगत करण्यात आले आहेत.

काळेपडळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यात या कारवाईमुळे यश आले असून, आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. तपास पथकातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही यशस्वी कारवाई पार पाडली. पुणे शहर पोलिसांकडून गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!