अमित शहा यांच्या हस्ते लोकमान्य टिळक पुरस्काराला काँग्रेसचा विरोध

अमित शहा यांच्या हस्ते लोकमान्य टिळक पुरस्काराला काँग्रेसचा विरोध

विद्यार्थी आंदोलनावरील कथित कारवाईचा निषेध; प्रशांत जगताप, दीप्ती चौधरींसह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा

पुणे :

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने शनिवारी तीव्र निदर्शने केली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरील कथित पोलिस कारवाईचा निषेध नोंदवत काँग्रेसने अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

काँग्रेसने आरोप केला की, दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या कथित पोलिस कारवाईसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नैतिकदृष्ट्या जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्या हस्ते लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करणे म्हणजे लोकमान्य टिळक यांच्या विचारांचा अपमान असल्याचा दावा काँग्रेसने केला.

आंदोलनासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. सुरुवातीला परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र, त्यानंतर कार्यक्रमस्थळापासून एक किलोमीटर अंतरावर आंदोलनाची परवानगी देण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला. आंदोलनादरम्यान “हुकूमशहा अमित शहा गो बॅक”, “अमित शहा यांचा धिक्कार असो” आणि “अदानीला पायघड्या, विद्यार्थ्यांना बेड्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

यावेळी काँग्रेसचे पूर्व विभागाध्यक्ष प्रशांत जगताप यांनी विद्यार्थ्यांवरील कथित कारवाईचा निषेध करत अमित शहा यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चौधरी यांनीही विद्यार्थी आणि महिलांवरील कथित पोलिस कारवाईचा निषेध करत केंद्र सरकारवर टीका केली.

आंदोलनादरम्यान प्रशांत जगताप, दीप्ती चौधरी, पुणे महापालिकेतील काँग्रेस गटनेते रामचंद्र (चंदू) कदम यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा काँग्रेसने केला. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष लहूअण्णा निवंगुणे यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )
error: Content is protected !!