
1 जूनपासून देशात 5 मोठे बदल; सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम
नवी दिल्ली
मे महिन्याचा आज शेवटचा दिवस असून उद्यापासून म्हणजेच 1 जून 2026 पासून देशभरात अनेक महत्त्वाचे आर्थिक आणि व्यावसायिक बदल लागू होणार आहेत. एलपीजी सिलेंडरच्या किमतींपासून ते पेट्रोल-डिझेलवरील शुल्क, बँकिंग नियम, सोलर पॅनेल आणि कारच्या किमतींपर्यंत अनेक बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.
चला जाणून घेऊया 1 जूनपासून लागू होणारे हे 5 महत्त्वाचे बदल…
1) एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये बदलाची शक्यता
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल विपणन कंपन्या एलपीजी सिलेंडरचे नवीन दर जाहीर करतात. त्यामुळे उद्या घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये वाढ किंवा घट होऊ शकते.
तसेच, पीएनजी आणि एलपीजी अशी दोन्ही कनेक्शन असलेल्या ग्राहकांवरही कारवाईची शक्यता आहे. संबंधित नियमांचे पालन न करणाऱ्यांची ओळख पटवून गॅस कनेक्शन रद्द करण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते.
2) पेट्रोल, डिझेल आणि एटीएफवर नवीन निर्यात शुल्क
केंद्र सरकारने पश्चिम आशियातील तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल, डिझेल आणि हवाई इंधन (ATF) यांच्या निर्यातीवर नवीन शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवीन दरांनुसार,
- पेट्रोलवर प्रतिलिटर 1.5 रुपये
- डिझेलवर प्रतिलिटर 13.5 रुपये
- एटीएफवर प्रतिलिटर 9.5 रुपये
निर्यात शुल्क आकारले जाणार आहे. याचा परिणाम विमान कंपन्यांच्या खर्चावर होऊन हवाई प्रवास महागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
3) HDFC बँकेचे नवीन नियम लागू
HDFC बँकेने रोख रक्कम जमा करण्याच्या नियमांमध्ये बदल केला आहे.
नवीन नियमांनुसार,
- 20 रुपये किंवा त्यापेक्षा कमी मूल्याच्या नोटा – दरमहा 10,000 रुपयांपर्यंत
- नाणी – दरमहा 5,000 रुपयांपर्यंत
विनाशुल्क जमा करता येतील. यापेक्षा जास्त रक्कम जमा केल्यास 2 टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.
4) सोलर पॅनेलसाठी ALMM यादी बंधनकारक
1 जूनपासून केंद्र सरकारची Approved List of Models and Manufacturers (ALMM List-II) लागू होणार आहे.
सरकारी योजना आणि अनुदानित प्रकल्पांमध्ये आता केवळ या यादीतील सोलर मॉड्यूल आणि सेलचा वापर करता येणार आहे. गुणवत्तेचा दर्जा सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असला तरी सोलर पॅनेलच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
5) मारुती सुझुकीच्या गाड्या महागणार
नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर उद्यापासून तुम्हाला अधिक खर्च करावा लागू शकतो.
मारुती सुझुकीने आपल्या विविध मॉडेल्सच्या किमती वाढवण्याची घोषणा केली असून नवीन दर 1 जूनपासून लागू होणार आहेत. कंपनीच्या काही मॉडेल्सच्या किमतींमध्ये तब्बल 30 हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
थोडक्यात…
1 जूनपासून एलपीजी, पेट्रोल-डिझेल, बँकिंग, सोलर पॅनेल आणि वाहन क्षेत्रात महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या दैनंदिन खर्चावर आणि आर्थिक नियोजनावर होणार असल्याने नवीन नियमांची माहिती जाणून घेणे आवश्यक ठरणार आहे.

