
कोंढवा-उंड्री क्षेत्रीय कार्यालयातच सांडपाण्याचे डबके; ‘दिव्याखाली अंधार’
कात्रज,
नागरिकांच्या आरोग्याची आणि परिसराच्या स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या पुणे महापालिकेच्या कोंढवा-उंड्री क्षेत्रीय कार्यालयाच्या इमारतीखालीच सांडपाणी साचल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कार्यालयाच्या तळमजल्यावरील वाहनतळात मोठ्या प्रमाणात सांडपाणी साचले असून, त्याकडे आरोग्य विभाग आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
क्षेत्रीय कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना आपली वाहने तळमजल्यावरील वाहनतळात उभी करावी लागतात. मात्र, वाहनतळात साचलेल्या घाणेरड्या पाण्यातून मार्ग काढत नागरिकांना कार्यालयात जावे लागत आहे. सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण झाली असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होण्यास पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित विभागांचे कार्यालय असलेल्या इमारतीतच अशी परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाच्या स्वच्छता व्यवस्थेवरच प्रश्न उपस्थित होत आहेत.
‘दिव्याखाली अंधार’ या म्हणीचा प्रत्यय कोंढवा-उंड्री क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरातील परिस्थितीमुळे येत आहे. ज्या कार्यालयातून संपूर्ण क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील स्वच्छता आणि आरोग्यविषयक प्रश्नांवर उपाययोजना केल्या जाणे अपेक्षित आहे, त्याच कार्यालयाच्या परिसरात सांडपाणी साचून राहणे ही बाब गंभीर मानली जात आहे.
संपूर्ण क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात स्वच्छतेची पाहणी आणि डास प्रतिबंधक उपाययोजना नियमितपणे होत असतील, तर स्वतःच्या कार्यालयाच्या परिसरातील सांडपाणी प्रशासनाच्या निदर्शनास का आले नाही? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
महापालिका प्रशासनाने तातडीने सांडपाण्याचा निचरा करून परिसराची स्वच्छता करावी, डास प्रतिबंधक फवारणी करावी आणि या समस्येची कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. कार्यालयाच्या दारातच अस्वच्छतेचे साम्राज्य असताना शहराच्या स्वच्छतेचे दावे कितपत प्रभावी आहेत, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

