
खड्ड्यांविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन; चार-पाच दिवसांत दुरुस्तीचे आश्वासन
हडपसर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि हडपसर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज भाजी मंडई येथे आंदोलन करण्यात आले.
महामार्गावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे तातडीने बुजवावेत, तसेच रस्त्याची दुरुस्ती करून वाहनचालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका निर्माण होत असून, वाहतुकीवरही परिणाम होत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक अजित घुले, युवक अध्यक्ष ईशान तुपे, हडपसर विधानसभा अध्यक्ष डॉ. शंतनु जगदाळे, युवक अध्यक्ष इंद्रसेन काकडे, महिला कार्याध्यक्ष रोहिणी क्षीरसागर, पदवीधर अध्यक्ष राहुल चव्हाण, उपाध्यक्ष अक्षय शेवाळे, दिग्विजय खरात, विठ्ठल विचारे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आंदोलनादरम्यान राष्ट्रीय महामार्ग विभागाचे सुर्वे यांना खड्डे बुजविण्याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढील चार ते पाच दिवसांत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
आश्वासनानुसार काम वेळेत पूर्ण करून महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

