खड्ड्यांत हरवला काळे बोराटे नगर–संकेत पार्क रस्ता

खड्ड्यांत हरवला काळे बोराटे नगर–संकेत पार्क रस्ता

शाळांच्या बसची मोठी वर्दळ असलेल्या मार्गावर वाहतूक कोंडी; रात्री पाण्यात बुडालेले खड्डे ठरताहेत अपघातांचे कारण, नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

 

फुरसुंगी : फुरसुंगी–उरुळी देवाची नगरपरिषद हद्दीतील काळे बोराटे नगर ते संकेत पार्क रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून, नगरपरिषदेचा पथ विभाग नेमके करतोय तरी काय, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

काळे बोराटे नगर ते संकेत पार्क हा परिसरातील महत्त्वाचा मार्ग असून, या भागात अनेक शैक्षणिक संस्था आणि शाळा आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसची या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. मात्र, रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग कमालीचा मंदावतो. परिणामी या मार्गावर वारंवार प्रचंड वाहतूक कोंडी होत असून, विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि वाहनचालकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

संकेत विहारमध्ये फोर व्हीलरलाही मार्ग काढणे कठीण

संकेत विहार परिसरातील रस्त्यांची अवस्था आणखी गंभीर झाली आहे. मोठमोठे खड्डे पडल्यामुळे फोर व्हीलर वाहनांनाही या रस्त्यावरून जाणे मुश्किल झाले आहे. खड्डे चुकविताना वाहनचालकांना धोकादायक पद्धतीने वाहने वळवावी लागतात. अनेक वेळा वाहने खड्ड्यांमध्ये जोरात आपटत असल्याने वाहनांचे मोठे नुकसान होत आहे.

दुचाकीस्वारांसाठी तर हा मार्ग धोकादायक ठरत आहे. खड्ड्यांमुळे वाहनांवरील नियंत्रण सुटून अपघात होण्याचा धोका वाढला आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना पाठीचे आणि मणक्याचे त्रास सहन करावे लागत असल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून करण्यात येत आहेत.

रात्री खड्डे दिसत नाहीत; पाण्यामुळे अपघातांचा धोका

पावसाळ्यात परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज येत नाही. परिणामी दुचाकीस्वार खड्ड्यात आदळण्याच्या किंवा घसरण्याच्या घटना घडत आहेत. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक जण या खड्ड्यांमध्ये पडून अपघातग्रस्त झाले आहेत.

एकीकडे रस्त्याची दुरवस्था, दुसरीकडे रात्रीची अपुरी दृश्यमानता आणि पाण्याने भरलेले खड्डे यामुळे या मार्गावर जीवितहानीचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

तात्पुरती मलमपट्टी नको; शास्त्रीय पद्धतीने कायमस्वरूपी दुरुस्ती करा

रस्त्यावर खड्डे पडले की केवळ माती, मुरूम अथवा निकृष्ट साहित्य टाकून तात्पुरती डागडुजी करण्याचा प्रकार प्रशासनाने थांबवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

खड्डे शास्त्रीय पद्धतीने आणि दर्जेदार साहित्याचा वापर करून कायमस्वरूपी बुजवावेत. रस्त्याची आवश्यक त्या ठिकाणी संपूर्ण दुरुस्ती करून त्याची गुणवत्ता टिकेल, अशा पद्धतीने काम करण्यात यावे. तसेच दुरुस्तीच्या कामाची गुणवत्ता तपासून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही रहिवाशांनी केली आहे.

नागरिकांचा संयम संपला; मोठ्या आंदोलनाचा इशारा

संकेत पार्क, संकेत विहार तसेच काळे बोराटे नगर परिसरातील नागरिकांनी रस्त्याच्या दुरवस्थेबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. वाहतूक कोंडी, अपघात, वाहनांचे नुकसान आणि नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम हे सर्व सहन करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांचा संयम आता सुटत चालला आहे.

नगरपरिषद प्रशासनाने तातडीने या रस्त्याची पाहणी करून खड्डे कायमस्वरूपी बुजवावेत, संपूर्ण रस्त्याची दुरुस्ती करावी आणि नागरिकांना सुरक्षित वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास संकेत पार्क परिसरातील नागरिक मोठे आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहेत. नागरिकांच्या जीविताशी संबंधित प्रश्नावर केवळ आश्वासने नकोत, तर प्रत्यक्ष आणि दर्जेदार काम करून दाखवावे, अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे.

“रस्त्याची झालेली दुरवस्था आणि वाहनांचे झालेले नुकसान खूप सहन केले. आता आणखी सहन केले जाणार नाही. तात्पुरती मलमपट्टी न करता शास्त्रीय पद्धतीने खड्डे बुजवून रस्ता सुरक्षित करावा. प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास मोठे आंदोलन उभारले जाईल,” असा स्पष्ट इशारा परिसरातील रहिवाशांनी दिला आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!