
स्टार बाजारसमोरील उखडलेल्या रस्त्यामुळे नागरिक हैराण
चार आठवड्यांपासून दुरुस्ती रखडली; एनआयबीएम चौकातील रस्त्यांचाही प्रश्न कायम
पुणे,
एनआयबीएम रस्त्यावरील स्टार बाजारसमोरील रस्ता गेल्या चार आठवड्यांपासून उखडलेल्या अवस्थेत असून, दुरुस्तीचे काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे वाहनचालक, पादचारी आणि परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
रस्त्याच्या कडेला राडारोडा, तुटलेले काँक्रीट आणि केबल्स पडून असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. पावसाळ्यामुळे या ठिकाणी अपघाताचा धोका वाढला असून, विशेषतः दुचाकीस्वारांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्ता खोदून काम पूर्ण झाल्यानंतरही दुरुस्तीकडे संबंधित विभागाने लक्ष दिलेले नाही. चार आठवडे उलटूनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
याचप्रमाणे एनआयबीएम चौक परिसरातही अनेक ठिकाणी रस्ते उखडलेल्या अवस्थेत असून, तेथेही राडारोडा आणि अपूर्ण कामांमुळे वाहतुकीवर परिणाम होत आहे. शहरातील महत्त्वाच्या मार्गांवरील ही परिस्थिती चिंताजनक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
स्टार बाजारसमोरील तसेच एनआयबीएम चौक परिसरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून राडारोडा हटवावा, तसेच सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी पुणे महापालिकेकडे केली आहे. एखादा अपघात घडण्यापूर्वीच प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

