
ससाणे नगरमध्ये रस्त्यावर तुटलेली इंटरनेट केबल; अपघाताची भीती
हडपसर :
ससाणे नगर रोडवरील कानिफनाथ हाऊसिंग सोसायटीसमोर इंटरनेट केबल तुटून रस्त्यावर पडल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भररस्त्यात पडलेल्या केबलमुळे विशेषतः दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका निर्माण झाला असून, संबंधित कंपनीने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
रविवारी सकाळी ही बाब नागरिकांच्या निदर्शनास आली. रस्त्यावर पडलेल्या केबलमुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होत असून, वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी ही केबल स्पष्टपणे दिसत नसल्याने गंभीर अपघात होण्याची शक्यता अधिक असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिक अनिकेत राठी म्हणाले, “रस्त्यावर पडलेली केबल ही नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारी बाब आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी ती नजरेस पडत नसल्याने मोठा अपघात होऊ शकतो. संबंधित इंटरनेट कंपनीने तातडीने केबल उचलून दुरुस्तीचे काम पूर्ण करावे.”
दरम्यान, संबंधित इंटरनेट सेवा पुरवठादार कंपनीने या घटनेची तात्काळ दखल घेऊन रस्त्यावर पडलेली केबल हटवून वाहतूक सुरक्षित करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी प्रशासनानेही याकडे लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

