
खोटे पुरावे, बनावट बिलं आणि ५ लाखांच्या लाचेचा आरोप; लोणी काळभोर पोलिसांचे प्रकरण ऐरणीवर
पार्श्वभूमी: सत्र न्यायालयाच्या ताशेऱ्यांनंतर पोलिस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
पुणे : एका निरपराध तरुणाला केवळ खोट्या इलेक्ट्रॉनिक पुराव्यांच्या आधारे तब्बल दहा वर्षे तुरुंगात सडावे लागल्याच्या प्रकरणात पुणे सत्र न्यायालयाने नुकतेच पोलिसांच्या तपासावर अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. न्यायालयाने तपासातील त्रुटी, पुराव्यांशी छेडछाड आणि अधिकारांच्या गैरवापरावर बोट ठेवल्यानंतर राज्यभरातील पोलीस तपासाच्या पारदर्शकतेबाबत गंभीर चर्चा सुरू झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीतील लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याने नव्याने वादाला तोंड फोडले आहे. या प्रकरणात तक्रारदाराने थेट पोलिसांवरच बनावट कागदपत्रांच्या आधारे गुन्हा दाखल केल्याचा आणि ५ लाख रुपयांची लाच घेतल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
*नेमके प्रकरण काय आहे?*
हडपसर येथील उद्योजक प्रतिक राजेश काबरा यांनी या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा वॉटर प्लांट मशिनरीच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार हा पूर्णपणे दिवाणी स्वरूपाचा होता.
आरोप असा आहे की, या व्यवहाराला गुन्हेगारी स्वरूप देण्यासाठी मूळ फिर्यादी आनंद मदनलाल लाहोटी यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर यांच्याशी संगनमत केले.
*बनावट कागदपत्रांचा घाट कसा घातला?*
तक्रारदार प्रतिक काबरा यांचा आरोप असा आहे की –
१) लाहोटी यांनी वॉटर प्लांटची मशीन चोरीला गेल्याचा बनाव रचला. त्यासाठी त्यांनी मशीनच्या खरेदीची बनावट बिले तयार केली.
२) आर्थिक व्यवहार दाखवण्यासाठी बँकेचे खोटे स्टेटमेंट तयार करून ते पोलिसांसमोर पुरावा म्हणून सादर केले.
३) तत्कालीन API कृष्णा बाबर यांनी या कागदपत्रांची कोणतीही प्राथमिक पडताळणी न करता, कोणतीही पूर्व चौकशी न करता थेट फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
नियमांनुसार अशा प्रकारच्या आर्थिक व दिवाणी स्वरूपाच्या तक्रारीत अगोदर कागदपत्रांची शहानिशा करणे बंधनकारक असते, मात्र तसे झाले नसल्याचा दावा काबरा यांनी केला आहे.
*जामीन रोखण्यासाठी जुन्या केसेसचा वापर आणि ५ लाखांच्या लाचेचा सनसनाटी आरोप*
या प्रकरणातील सर्वात गंभीर आरोप हा लाचखोरीचा आहे.
प्रतिक काबरा यांना न्यायालयात जामीन मिळू नये यासाठी पोलिसांनी जाणीवपूर्वक विरोध केला. जामीन अर्जाला विरोध करताना लोणी काळभोरसह इतर विविध पोलीस ठाण्यांतील जुन्या आणि असंबंधित गुन्ह्यांच्या नोंदीचा आधार घेण्यात आला, ज्यामुळे त्यांची जामीन प्रक्रिया लांबली.
याच दरम्यान, आणखी गंभीर गुन्ह्यांमध्ये गोवण्याची भीती दाखवून तत्कालीन API कृष्णा बाबर यांनी आपल्याकडून ५ लाख रुपयांची लाच घेतल्याचा थेट आरोप प्रतिक काबरा यांनी केला आहे. या लाचेच्या व्यवहाराची स्वतंत्र आर्थिक चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
*तक्रारदाराच्या ५ प्रमुख मागण्या:*
या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी तक्रारदाराने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे खालील मागण्या केल्या आहेत –
१) लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील संबंधित गुन्ह्याचा तपास कनिष्ठ अधिकाऱ्याकडून काढून घेऊन तो स्वतंत्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे वर्ग करावा.
२) फिर्यादीने सादर केलेल्या मशीनच्या मालकी हक्काच्या कागदपत्रांची आणि खरेदी बिलांची फॉरेन्सिक लॅबकडून पडताळणी करावी.
३) पोलिसांकडे सादर केलेले बँक स्टेटमेंट खरे आहे की बनावट, हे तपासण्यासाठी संबंधित बँकेकडून थेट अधिकृत स्टेटमेंट मागवून त्याची तुलना करावी.
४) तत्कालीन API कृष्णा बाबर यांच्या भूमिकेबाबत स्वतंत्र विभागीय चौकशी (Departmental Enquiry) सुरू करावी.
५) ५ लाख रुपयांच्या कथित लाच प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (ACB) चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करावी.
पुणे सत्र न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालात “तपास यंत्रणेने सादर केलेले पुरावे हे न्यायाचे मंदिर भ्रष्ट करणारे असतील तर ती गंभीर बाब आहे,” असे मत नोंदवले होते. त्यामुळे लोणी काळभोरच्या या प्रकरणाकडे आता केवळ एका गुन्ह्याच्या पलीकडे जाऊन पोलीस यंत्रणेच्या विश्वासार्हतेचा मुद्दा म्हणून पाहिले जात आहे. या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकारी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

