
आयुक्तांच्या पाहणीनंतरही उंड्रीतील टाटा इनोरा परिसरातील समस्या कायम!
आरएमसी प्लांटमधील धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; बुजवलेला पावसाळी नाला अद्याप खुला नाही – तलावाच्या संरक्षणासाठी सर्वेक्षण व सीमांकनाची मागणी
पुणे : पुणे महानगरपालिका आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी करूनही उंड्री येथील टाटा इनोरा सोसायटी परिसरातील समस्यांमध्ये अद्याप कोणताही ठोस बदल झालेला नसल्याची खंत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. परिसरातील रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्लांटमधून उडणाऱ्या धुळीमुळे हवेची गुणवत्ता खालावत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वारंवार तक्रारी करून आणि प्रशासनाचे लक्ष वेधूनही परिस्थिती कायम असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
या परिसरात सुरू असलेल्या आरएमसी प्लांटमधून मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट उडत असल्याने परिसरातील रहिवाशांना श्वसनाच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. त्यामुळे संबंधित प्लांटची पर्यावरणविषयक नियमांनुसार तपासणी करून नियमभंग आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
पावसाळी नाला सिमेंट टाकून बुजवल्याची तक्रार
आरएमसी प्लांट चालकांकडून पावसाळी पाण्याचा निचरा होणाऱ्या नाल्यात सिमेंट टाकून तो बुजवण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. ही बाब महापालिका आयुक्तांच्या प्रत्यक्ष पाहणीदरम्यान निदर्शनास आणून देण्यात आली होती. मात्र, अद्यापही नाला पूर्णपणे मोकळा करण्यात आलेला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. परिणामी, पावसाचे पाणी रस्त्यावर साचत असून दुचाकीस्वारांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून या समस्यांबाबत महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मात्र, प्रत्यक्ष पाहणीनंतरही ठोस कार्यवाही होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
तलावाच्या संरक्षणासाठी तातडीने उपाययोजना करा
याशिवाय परिसरातील तलावाच्या संरक्षणाचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. तलावाचे तातडीने सर्वेक्षण करून अधिकृत सीमांकन करावे. तसेच तलावाचे खोलीकरण, गाळ काढणे आणि स्वच्छता मोहीम राबवून त्याचे अस्तित्व व पर्यावरणीय महत्त्व जपावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
महापालिका आयुक्त आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे मागण्या
1. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या आरएमसी प्लांटची तातडीने संयुक्त तपासणी करावी.
2. पर्यावरणविषयक नियमांचे उल्लंघन सिद्ध झाल्यास संबंधित प्लांटचे परवाने रद्द करून प्लांट कायमस्वरूपी बंद करण्याची कार्यवाही करावी.
3. सिमेंट टाकून बुजवण्यात आलेला पावसाळी नाला तातडीने मोकळा करून त्याची दुरुस्ती करावी.
4. परिसरातील तलावाचे सर्वेक्षण व अधिकृत सीमांकन करावे.
5. तलावाचे खोलीकरण, गाळ काढणे आणि स्वच्छतेची मोहीम तातडीने हाती घ्यावी.
6. यापूर्वी करण्यात आलेल्या तक्रारी व आयुक्तांच्या पाहणीच्या अनुषंगाने झालेल्या कार्यवाहीचा अहवाल नागरिकांना द्यावा.
नागरिकांच्या आरोग्याशी, सुरक्षिततेशी आणि पर्यावरणाशी संबंधित या प्रश्नांकडे आता दुर्लक्ष करू नये. केवळ पाहणी आणि आश्वासनांपुरते प्रशासनाचे काम मर्यादित न राहता प्रत्यक्ष जागेवर बदल दिसला पाहिजे. पुणे महानगरपालिका आयुक्त आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून ठोस कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

