
सात वर्षांपूर्वी उद्घाटन झालेल्या चिंतामणी भाजी मंडईची दुरवस्था!
हांडेवाडी रस्त्यावरील मंडईत अस्वच्छता, दुर्गंधी, पिण्याच्या पाण्याचा अभाव; सुरक्षा रक्षकावर तिघांचा हल्ला, व्यापाऱ्यांचा महापालिका प्रशासनाला सवाल
हडपसर : पुणे महानगरपालिकेच्या कोंढवा-उंड्री क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ४१ मधील हांडेवाडी रस्त्यावरील चिंतामणी भाजी मंडईचे उद्घाटन होऊन सात वर्षे उलटली आहेत. मात्र, या मंडईतील मूलभूत सुविधांचा अभाव आणि अस्वच्छतेच्या समस्यांमुळे व्यापारी तसेच ग्राहक त्रस्त झाले आहेत.
नुकताच मध्यरात्री २:३० वाजण्याच्या सुमारास मंडईत कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षक आकाश कोठावळे यांच्यावर तिघांनी प्राणघातक हल्ला केला. या घटनेत ते जखमी झाले असून, त्यांच्यावर नोबल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे मंडईतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मंडईच्या सुरक्षेच्या दृष्टीने अनेक ठिकाणी संरक्षक कुंपण नसल्याचे दिसून येते. स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता होत नसल्याने संपूर्ण मंडई परिसरात दुर्गंधी पसरली आहे. परिणामी भाजीपाला खरेदीसाठी येणारे ग्राहकही नाक मुरडत असल्याचे चित्र आहे.
मंडईमध्ये पिण्याच्या स्वच्छ पाण्याची पुरेशी व्यवस्था नाही. स्वच्छता सेवकांकडून नियमित स्वच्छता केली जात नसल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. अनेक ठिकाणी कचरा साचलेला असून अस्वच्छतेमुळे रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याशिवाय मंडई परिसरात अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाल्याचेही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
दरमहा ७५० रुपयांचे बिल, तरी सुविधा कुठे?
मंडईतील व्यापाऱ्यांकडून अतिक्रमण विभागाकडून दरमहा ७५० रुपयांचे बिल दिले जाते. मात्र, त्याबदल्यात आवश्यक सुविधा मिळत नसल्याची नाराजी व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. खंडेराव जगताप यांनी, “महापालिका फक्त भाडे गोळा करण्यासाठी येते का? व्यापाऱ्यांकडून दरमहा पैसे घेतले जातात, मग आम्हाला मूलभूत सुविधा का दिल्या जात नाहीत?” असा सवाल केला आहे.
महापालिका अधिकाऱ्यांची भूमिका काय?
या समस्यांबाबत प्रभाग क्रमांक ४१ आरोग्य विभागाच्या श्रीराम चौक आरोग्य कोठीतील मुकादम सुनीता पवार यांच्याशी संपर्क साधला असता, मंडई परिसरात नियमित स्वच्छता केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच काही समस्या असल्यास त्या तातडीने सोडविण्यात येतील, असे आश्वासन दिले.
दरम्यान, अतिक्रमण विभागाचे अतिक्रमण निरीक्षक दीपक कुमदले यांच्याशी संपर्क साधला असता, मंडई विभागाची जबाबदारी आपल्याकडे अवघ्या एक महिन्यापूर्वीच देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सात वर्षांनंतरही मूलभूत सुविधांची वानवा का?
महापालिकेने उभारलेल्या मंडईमध्ये स्वच्छता, पिण्याचे पाणी, सुरक्षा आणि अतिक्रमण नियंत्रण यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. सुरक्षा रक्षकावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मंडईतील सुरक्षा व्यवस्था, संरक्षक कुंपण, सीसीटीव्ही यंत्रणा आणि रात्रीच्या गस्तीसंदर्भात प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
व्यापाऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची दखल घेऊन कोंढवा-उंड्री क्षेत्रीय कार्यालयाने प्रत्यक्ष पाहणी करावी आणि समस्यांवर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी स्थानिक व्यापाऱ्यांकडून होत आहे.

