
बनावट दारूमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणी हडपसरमध्ये संताप
Rohit Pawar यांनी घेतली पीडित कुटुंबीयांची भेट; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
पुणे : हडपसर परिसरातील बनावट दारूमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणाने शहरात मोठी खळबळ उडाली असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार Rohit Pawar यांनी या घटनेत मृत्यू झालेल्या यशवंत पवार आणि अरुण वामन दादर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले व संपूर्ण घटनेची माहिती घेतली.
यावेळी पीडित कुटुंबीयांनी प्रशासनाच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. यशवंत पवार यांचा मृत्यू विषारी दारूमुळे झाला असताना संबंधित शासकीय यंत्रणांकडून कुटुंबीयांना “हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला” असे सांगण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. त्यामुळे पोलीस व आरोग्य यंत्रणांनी मृत्यूचे खरे कारण लपवण्याचा प्रयत्न केला का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणात स्थानिक पोलीस आणि बनावट दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये संगनमत असल्याचा आरोपही करण्यात आला. “आज पुण्यातील १८ कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. हे मृत्यू केवळ अपघात नसून यंत्रणांच्या निष्काळजीपणातून घडलेले खून आहेत,” अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.
यावेळी Rohit Pawar यांनी प्रशासनावर जोरदार टीका करत, “पीडित कुटुंबांना मृत्यूचे खोटे कारण सांगितले गेले असेल, तर ते अत्यंत गंभीर आहे. सत्य बाहेर आलेच पाहिजे. दोषींना कोणतीही राजकीय किंवा प्रशासकीय संरक्षण मिळू नये,” असे स्पष्ट केले.
दरम्यान, शहरातील वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे, कोयता गॅंगचे वाढते जाळे आणि पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. “विकसित पुण्याची वाटचाल गुन्हेगारांच्या शहराकडे सुरू आहे. प्रशासनाने वेळेत कारवाई केली नाही, तर अशा घटना इतर भागांतही घडू शकतात,” असा इशाराही देण्यात आला.
यावेळी हडपसर परिसरातील बनावट दारूचा अड्डा उध्वस्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच, बनावट दारूमुळे मृत्यू झालेल्या सर्व कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी आणि या संपूर्ण प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
प्रमुख मागण्या
- बनावट दारू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी
- मृत्यूचे खरे कारण लपवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी
- दोषी दारू माफिया व संबंधितांवर कठोर गुन्हे दाखल करावेत
- मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत द्यावी
- अवैध दारू विक्रीविरोधात विशेष मोहीम राबवावी
या प्रकरणामुळे हडपसर परिसरात तीव्र संतापाचे वातावरण असून, नागरिकांकडून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

