
उंड्रीतील आरएमसी प्लँट १७ ऑगस्टपर्यंत बंद करा; खा. सुळे
पुणे,
उंड्री परिसरातील आरएमसी (रेडी मिक्स काँक्रीट) प्लँटमुळे होत असलेल्या प्रदूषण आणि नागरिकांच्या गैरसोयीच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे महानगरपालिकेला १७ ऑगस्टपर्यंत संबंधित प्लँट बंद करण्याचे अल्टिमेटम दिले आहे.
सुळे यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, उंड्री परिसरातील स्थानिक नागरिकांनी महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि इतर संबंधित संस्थांकडे वारंवार लेखी तक्रारी केल्या असून आंदोलनेही केली आहेत. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
पत्रानुसार, आरएमसी प्लँटसाठी सुरू असलेल्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे परिसरातील रस्त्यांची दुरवस्था होत असून धूळ व इतर प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. तसेच पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित संस्था हे प्लँट का बंद करत नाहीत किंवा त्यामागील कारणांचा खुलासा का करत नाहीत, असा सवालही करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे महानगरपालिकेला १७ ऑगस्टपर्यंत आरएमसी प्लँट बंद करण्याची मागणी केली आहे. या मुदतीत कारवाई न झाल्यास २४ ऑगस्ट रोजी त्या स्वतः उंड्री परिसरातील नागरिकांसह पुणे महानगरपालिकेसमोर बेमुदत उपोषणाला बसतील, असा इशारा पत्रातून देण्यात आला आहे.
तसेच, “या उपोषणाची सर्वस्वी जबाबदारी पुणे महानगरपालिका आणि शासनाची राहील,” असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

