दुर्गा माता मंदिर–शिवतेज नगर रस्त्यावरील पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर

दुर्गा माता मंदिर–शिवतेज नगर रस्त्यावरील पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर

हडपसर : काळे बोराटे नगर येथील सर्व्हे क्रमांक ३०२, साई विहार परिसरातील दुर्गा माता मंदिर ते शिवतेज नगर रस्त्यावर दोन्ही बाजूंना चारचाकी वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. या मार्गावरून दररोज सुमारे १५ हजार नागरिक प्रवास करतात, असा दावा करण्यात आला आहे.

रस्त्याच्या कडेला वाहनांच्या पार्किंगमुळे वाहतुकीसाठी उपलब्ध जागा कमी होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

हडपसर नागरी कृती समितीचे सूरज कुदळे यांनी रस्त्यालगत पर्यावरण संवर्धनासाठी लावलेली झाडे पार्किंगसाठी तोडण्यात आल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

प्रत्यक्ष पाहणी करून तक्रारी सोडविणार

याबाबत काळे पडळ वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक देवेंद्र पवार यांच्याशी संपर्क साधला असता, नागरिकांनी केलेल्या तक्रारींची प्रत्यक्ष पाहणी करून त्या सोडविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. तसेच, नागरिकांनी वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने रस्त्यावर वाहने उभी करू नयेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित वाहनचालकांवर कारवाई करण्यात येईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

संबंधित रस्त्यावर आवश्यक ठिकाणी ‘नो पार्किंग’ फलक लावावेत, अशी मागणी वाहतूक विभागाकडे करण्यात आली आहे. तसेच, वृक्षतोडीच्या आरोपाची चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी उद्यान विभागाकडे करण्यात आली आहे.

स्थानिक नागरिक अजिंक्य कुदळे सविता हिंगणे म्हणतात की रात्रीच्या वेळी रस्त्यावर पार्किंग केल्यामुळे वाहतुकीसाठी रस्ता शिल्लक राहत नाही.

 

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!