रात्रभर अंधारात ससाणे नगर; महावितरण भोंगळ कारभार

रात्रभर अंधारात ससाणे नगर; महावितरण भोंगळ कारभार

मना न्युज नेटवर्क

हडपसर,

ससाणे नगर परिसरातील नागरिकांना गुरुवारी सायंकाळपासून रात्रभर अंधारात राहण्याची वेळ आल्याने महावितरणच्या निष्क्रिय आणि भोंगळ कारभाराविरोधात संतापाची लाट उसळली आहे. लेन क्रमांक ५, ६, ७, ८, ९ आणि १० मधील अनेक भागांमध्ये शुक्रवारी सकाळपर्यंतही वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. त्यामुळे नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले.

सायंकाळी सुमारे ६ वाजता वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिकांनी वारंवार ऑनलाइन तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून केवळ आश्वासने देण्यात आली. “रात्री १ वाजेपर्यंत लाईट येईल” असे सांगण्यात आले, मात्र काही भागात वीज काही वेळासाठी येऊन पुन्हा खंडित झाली. त्यामुळे नागरिकांचा संताप अधिकच वाढला. उकाड्यामुळे लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना मोठा त्रास सहन करावा लागला.

सकाळी पाणीपुरवठा सुरू असूनही वीज नसल्यामुळे मोटारी बंद राहिल्या आणि अनेक घरांमध्ये पाणी भरता आले नाही. “एक दिवस वीज बिल भरायला उशीर झाला तर लगेच कनेक्शन तोडायला कर्मचारी येतात; मग हजारो नागरिक रात्रभर अंधारात असताना महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी कुठे होते?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

या प्रकाराविरोधात नितीन टिळेकर, रोहन ससाणे, अमोल कन्हेरे, कविता कोकाटे, राजेंद्र डांगमाळी, निखिल नखाते, स्वप्नील वाघ आणि नीता चंद्रशेखर यांनी तीव्र संताप व्यक्त करत महावितरण प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. स्थानिक नागरिकांच्या मते, ससाणे नगर परिसरात वारंवार वीज खंडित होण्याच्या घटना वाढल्या असून महावितरणकडून कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना केली जात नाही.

त्यामुळे प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. दरम्यान, समस्या तातडीने मार्गी न लागल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांकडून देण्यात आला आहे. ससाणे नगर भाग अभियंता अंकुश सरोदे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की काल दुपारी मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे ससाणे नगर येथे केबल दोन ठिकाणी नादुरुस्त झाली , काल रात्री पासून काम युद्ध पातळीवर सुरू आहे

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )
error: Content is protected !!