
सावधान ! मालमत्ता खरेदीपूर्वी सर्व शासकीय मंजुरींची पडताळणी करा
पुणे,
पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांमधील नागरिकांना अनधिकृत प्लॉटिंग आणि बेकायदेशीर बांधकामांबाबत सावध राहण्याचे आवाहन केले आहे. कोणताही भूखंड किंवा सदनिका खरेदी करण्यापूर्वी आवश्यक शासकीय मंजुरी आणि कायदेशीर कागदपत्रांची खातरजमा करावी, असा सल्ला महापालिकेने दिला आहे.
महापालिकेच्या निदर्शनास आले आहे की, काही ठिकाणी आवश्यक परवानग्या न घेता भूखंडांची विक्री केली जात असून, मंजुरी नसलेल्या इमारतींमधील सदनिकांचाही व्यवहार सुरू आहे. अशा मालमत्ता खरेदी करणाऱ्या नागरिकांना भविष्यात कायदेशीर वाद, आर्थिक नुकसान तसेच मूलभूत नागरी सुविधा मिळण्यात अडचणी येण्याची शक्यता असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
महापालिकेने नागरिकांना कोणताही व्यवहार करण्यापूर्वी संबंधित मालमत्तेचा मंजूर ले-आऊट, बांधकाम परवानगी, विकास आराखडा आणि इतर आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करण्याचे आवाहन केले आहे. केवळ जाहिराती किंवा विकासकांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून व्यवहार करू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
अनधिकृत बांधकामांमध्ये भविष्यात पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था, रस्ते, वीज यांसारख्या मूलभूत नागरी सुविधा मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. तसेच अशा मालमत्तांवर प्रशासकीय कारवाई होण्याची किंवा मालकी हक्कासंदर्भात वाद निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
अनधिकृत प्लॉटिंग किंवा बेकायदेशीर बांधकामांची माहिती नागरिकांनी तातडीने महापालिकेला द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणारे विकासक आणि संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांमध्ये वाढत्या अनधिकृत विकासाच्या तक्रारी लक्षात घेऊन हे सार्वजनिक आवाहन करण्यात आले असून, नागरिकांची आर्थिक फसवणूक टाळणे आणि नियोजनबद्ध शहरी विकासाला चालना देणे हा त्यामागील उद्देश असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

