
हडपसर-मांजरीत अतिक्रमणांवर महापालिकेचा बुलडोझर!
हडपसर-मांजरीत अतिक्रमणांवर महापालिकेचा बुलडोझर!
**एकाच दिवसात २६ हजार चौरस फुटांवरील अनधिकृत बांधकामे निष्कासित; १५ काउंटर, ८६ शेड आणि ११ झोपड्यांवर कारवाई**
**हडपसर, ता. १९ :** पुणे महानगरपालिकेच्या हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत अतिक्रमण निर्मूलन विभागाने गुरुवारी (दि. १९) जोरदार कारवाई केली. डीपी रोड, माळवाडी, ससाणेनगर आणि हडपसर-रामटेकडी परिसरात अनधिकृत रस्ते व पदपथांवरील अतिक्रमणे तसेच कच्ची शेड हटविण्यात आली. या कारवाईत तब्बल २६ हजार चौरस फुटांवरील कच्चे व पक्के अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले.
महापालिकेच्या परिमंडळ क्रमांक ४ च्या अतिक्रमण पथकाने महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, पोलीस कर्मचारी, बिगारी सेवक आणि अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही मोहीम राबविली. कारवाईसाठी ओपन ट्रक आणि पिंजरा वाहनांसह आवश्यक यंत्रणा तैनात करण्यात आली होती.
या कारवाईत १५ काउंटर, ८६ शेड आणि ११ झोपड्या निष्कासित करण्यात आल्या. अतिक्रमण निरीक्षक साईनाथ निकम, सहायक निरीक्षक किरण शिंदे, प्रशांत कोळेकर, विनोद दुधे, अमोल धुळे, दीपक कुमदाळे आणि प्रतीक सानप यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपआयुक्त सोमनाथ बनकर आणि हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त कुणाल धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
**कारवाई यापुढेही सुरू राहणार**
अनधिकृत अतिक्रमणांविरोधात यापुढेही वारंवार आणि नियमितपणे कारवाई करण्यात येणार असल्याचे अतिक्रमण निरीक्षक साईनाथ निकम यांनी सांगितले. त्यामुळे रस्ते आणि पदपथांवरील अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले असून, महापालिकेची ही मोहीम सातत्याने सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

