
लष्कर जलशुद्धीकरण केंद्राच्या चाचणीचा फटका; ससाणे नगरमध्ये दूषित पाणीपुरवठा
लष्कर जलशुद्धीकरण केंद्राच्या चाचणीचा फटका; ससाणे नगरमध्ये दूषित पाणीपुरवठा
पुणे, हडपसर : लष्कर पाणीपुरवठा विभागाकडून नव्या जलकुंभाची चाचणी सुरू असताना कोणतीही पूर्वसूचना न देता आज दुपारी ससाणे नगर भागात पाणीपुरवठा करण्यात आला. या पाण्यामध्ये प्रचंड दुर्गंधी व गढूळपणा असल्याने संपूर्ण भागात दूषित पाणीपुरवठा झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.
वर्धमान सोसायटीच्या साठवण टाक्यांमध्ये हेच दूषित पाणी जमा झाल्याने टाक्यांना दुर्गंधी सुटली आहे. हे पाणी पिण्यायोग्य नसून, साथीच्या आजारांचा धोका असल्याने सोसायटीने सर्व टाक्या तातडीने रिकाम्या करून स्वच्छतेसाठी घेतल्या आहेत. उद्या सकाळपर्यंत पाणीपुरवठा नसल्याने नागरिकांना पाण्यावाचून हाल सहन करावे लागत आहेत.
दरम्यान, खाजगी कामगारांकडून टाक्या स्वच्छ कराव्या लागत असल्याने सोसायट्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या प्रकाराला पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
यासंदर्भात लष्कर पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता वैष्णव शिंदे म्हणाले, “नवीन पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांमधून पुरवठ्याची चाचणी सुरू आहे. त्यामुळे काही ठिकाणी तक्रारी आल्या आहेत. लवकरच यावर उपाययोजना करण्यात येईल.”
मात्र, पूर्वसूचना न देता केलेल्या या प्रकारामुळे नागरिकांना नाहक त्रास व आर्थिक नुकसान सहन करावे लागत असून, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ससाणे नगरमधील नागरिकांनी केली आहे.

