डॉक्टरांच्या लेखणीतून उमलल्या संवेदनशील कविता; ‘अंतिश’ कवितासंग्रहाचे थाटात प्रकाशन

डॉक्टरांच्या लेखणीतून उमलल्या संवेदनशील कविता; ‘अंतिश’ कवितासंग्रहाचे थाटात प्रकाशन

प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांच्या हस्ते प्रकाशन; साहित्यिक, डॉक्टर आणि रसिकांची उपस्थिती

हडपसर : वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असतानाच साहित्याची आवड जोपासणारे डॉ. सतीश बबनराव झगडे यांच्या ‘अंतिश’ या मराठी कवितासंग्रहाचे प्रकाशन रविवारी (दि. २२ नोव्हेंबर) हडपसर येथील नोबल एच.एम.ए. भवन येथे उत्साहात पार पडले. प्रसिद्ध लेखक, गीतकार आणि दिग्दर्शक अरविंद जगताप यांच्या हस्ते या कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.

न्यू ईरा पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेल्या या कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध गझलकार सुरेशकुमार वैराळकर उपस्थित होते. यावेळी न्यू ईरा पब्लिशिंग हाऊसच्या प्रकाशिका अमृता तांदळे, नोबल हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. दिलीप माने, पुणे महापालिकेचे उपायुक्त डॉ. संतोष टेंगले आणि लेखक सतीश इंदापूरकर यांची विशेष उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे निमंत्रक डॉ. सतीश बबनराव झगडे आणि डॉ. मीना सतीश झगडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. डॉ. मंगेश बोराटे यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

प्रकाशन सोहळ्यात मान्यवरांनी ‘अंतिश’मधील निवडक कवितांचे वाचन केले. डॉ. झगडे यांच्या साध्या, सहज आणि मनाला भिडणाऱ्या काव्यशैलीचे यावेळी कौतुक करण्यात आले. कविता ही केवळ लिहिण्याची गोष्ट नसून ती जगण्याची अनुभूती आहे. डॉ. झगडे यांच्या कविता जगलेल्या अनुभवांतून साकारल्या आहेत, अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली.

यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. सतीश झगडे म्हणाले, “ही पुस्तके मी लिहिली नाहीत, ती माझ्याकडून लिहिली गेली. आता त्या फक्त माझ्या राहिल्या नाहीत, त्या तुमच्या झाल्या आहेत.”

या सोहळ्यास डॉ. प्रल्हाद पोटे, डॉ. आबनावे, डॉ. मंगेश वाघ, डॉ. अशोक जैन यांच्यासह अनेक डॉक्टर, पुण्यातील साहित्यिक, कवी, रसिक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक नंदकुमार जगताप यांनी केले, तर डॉ. संदीप लोंढे यांनी आभार मानले.

वैद्यकीय सेवेसोबत साहित्याची साधना जपत डॉ. झगडे यांनी ‘अंतिश’च्या माध्यमातून आपल्या भावविश्वातील अनुभव वाचकांसमोर मांडले आहेत.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!