
दौंडमधील १०२ विकासकामांच्या ई-निविदा रखडल्या
मुदत संपून पंधरा दिवस उलटले; जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
दौंड : पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने दौंड तालुक्यातील विविध विकासकामांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या तब्बल १०२ ई-निविदांची प्रक्रिया रखडली आहे. निविदा सादर करण्याची मुदत संपून सुमारे पंधरा दिवसांचा कालावधी उलटत आला असतानाही अद्याप निविदा उघडण्यात आलेल्या नसल्याने जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दौंड तालुक्यातील विविध विकासकामांसाठी जिल्हा परिषदेने ऑनलाइन पद्धतीने ई-निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. नियमानुसार निविदा सादर करण्याची मुदत संपल्यानंतर निविदा उघडून त्यानंतरची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र, निविदा उघडण्यास होत असलेल्या विलंबामुळे संबंधित ठेकेदारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
निविदा प्रक्रिया रखडण्याचे नेमके कारण काय? असा सवाल ठेकेदारांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, काही जिल्हा परिषद सदस्यांकडून बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच संबंधित टेंडर लिपिकावर दबाव आणला जात असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. मात्र, या चर्चेला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
ई-निविदा प्रक्रिया पारदर्शक आणि नियमांनुसार होणे अपेक्षित असताना निविदा उघडण्यास होत असलेल्या विलंबामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कारभाराबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. निविदा प्रक्रिया लांबल्यास विकासकामांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीवर परिणाम होण्याची शक्यता असून कामे वेळेत पूर्ण होतील का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
१०२ निविदा कधी उघडणार?
दौंड तालुक्यातील १०२ विकासकामांच्या निविदा नेमक्या कधी उघडल्या जाणार आणि रखडलेल्या प्रक्रियेला गती कधी मिळणार, याकडे नागरिक तसेच ठेकेदारांचे लक्ष लागले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन निविदा प्रक्रिया पूर्ण करावी आणि झालेल्या विलंबाचे कारण स्पष्ट करावे, अशी मागणी होत आहे.

