
आग्रा ते राजगड ‘गरुडझेप’ मोहिमेत हडपसरचे जनार्दन शिवरकर
१,४०० किलोमीटरहून अधिक अंतराचा प्रवास १२ दिवसांत; ४९ सायकलस्वारांचा सहभाग
हडपसर : छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्रा येथून राजगडाकडे केलेल्या ऐतिहासिक प्रवासाच्या स्मृती जागविण्यासाठी आयोजित ‘गरुडझेप मोहीम २०२६’ मध्ये हडपसरचे जनार्दन शिवरकर सहभागी झाले. आग्रा ते राजगड असा तब्बल १,४०० किलोमीटरहून अधिक अंतराचा प्रवास अवघ्या १२ दिवसांत सायकलवरून पूर्ण करण्यात आला.
महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेले ४९ सायकलस्वार या मोहिमेत सहभागी झाले होते. उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील ७८ शहरांमधून ही मोहीम मार्गक्रमण करत राजगडावर पोहोचली. सायकलस्वारांसोबत सुमारे ५० जणांनी हातात मशाली घेऊन पायी प्रवास केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्रा ते राजगड प्रवासासाठी वापरलेल्या ऐतिहासिक मार्गावरूनच ही मोहीम पार पडली.
ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता सायकलस्वारांनी जिद्द, मेहनत आणि सातत्याने हे आव्हान पूर्ण केले. २७ ऑगस्ट रोजी राजगडावर मोहिमेचा समारोप झाला.
‘कर्तृत्ववान राजे महाराष्ट्रात जन्मले, याचा अभिमान’
मोहिमेत सहभागी होऊन हडपसरमध्ये परतलेल्या जनार्दन शिवरकर यांचे नागरिक आणि इतिहासप्रेमींकडून स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना, “जगातील सर्वांत कर्तृत्ववान राजे आपल्या महाराष्ट्राच्या भूमीत जन्मले, याचा सार्थ अभिमान वाटतो,” असे सांगितले.
“सायकल चालवा, शरीर तंदुरुस्त ठेवा आणि समाज, देव व देशाचा अभिमान बाळगा,” असा संदेशही त्यांनी दिला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पराक्रमाची आठवण जागविण्यासोबतच तरुणांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, साहस आणि इतिहासाविषयी अभिमान निर्माण करण्याचा संदेश या मोहिमेतून देण्यात आला.

