
इडलीत चक्क झुरळ; सह्याद्री रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार करूनही दिवसभर कारवाई नसल्याचा आरोप; अन्न व औषध प्रशासनाकडून चौकशीची मागणी
हडपसर : रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना दिल्या जाणाऱ्या अन्नाच्या दर्जाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हडपसर येथील सह्याद्री सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाला नाश्त्यासाठी देण्यात आलेल्या इडलीमध्ये चक्क झुरळ आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे रुग्णालयातील अन्नाच्या स्वच्छतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कुणाल देशमुख यांच्या आईवर या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरुवारी (दि. २७) सकाळी त्यांना नाश्त्यासाठी इडली-सांबार देण्यात आले. इडलीचा अर्धा तुकडा खाल्ल्यानंतर त्यामध्ये झुरळ असल्याचे निदर्शनास आले. प्रकार लक्षात येताच उर्वरित इडली खाण्यापासून त्यांनी आईला रोखले.
या प्रकाराची माहिती तत्काळ रुग्णालय प्रशासनाला देण्यात आली. मात्र, तक्रार करूनही दिवसभर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधल्यानंतर या प्रकरणाची दखल घेण्यासाठी धावपळ सुरू झाल्याचे सांगण्यात आले.
अन्न प्रशासन कारवाई करणार का?
रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना स्वच्छ व सुरक्षित अन्न मिळणे अपेक्षित असताना अन्नामध्ये झुरळ आढळणे ही गंभीर बाब आहे. विशेषतः आजारपणामुळे रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी झालेली असू शकते. त्यामुळे दूषित अथवा अस्वच्छ अन्नाचा त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने या घटनेची तातडीने दखल घेऊन रुग्णालयातील स्वयंपाकघर, अन्न तयार करण्याची प्रक्रिया, स्वच्छतेची स्थिती तसेच अन्न पुरवठा करणाऱ्या संबंधित यंत्रणेची तपासणी करावी. दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांच्या आरोग्याशी संबंधित अशा गंभीर प्रकारांकडे प्रशासनाने दुर्लक्ष करू नये. या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई होणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

