खंडणीखोर पोलिसासह दोघांवर गुन्हा दुकानदाराला गुटख्याच्या कारवाईचा धाक

खंडणीखोर पोलिसासह दोघांवर गुन्हा दुकानदाराला गुटख्याच्या कारवाईचा धाक

पुणेः
गुटखा विक्री करीत असल्याचे सांगून कारवाई करण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलीस अंमलदारासह एका खासगी व्यक्तीविरुद्ध फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात दुकानदाराकडून दोघांनी १ लाख ६५ हजार रुपये घेतल्याची तक्रार करण्यात आली आहे. ही घटना ८ ऑक्टोबर रोजी सकाळी सात ते नऊ वाजण्याच्या दरम्यान उरुळी देवाची येथील पूजा ट्रेडर्स या किराणा दुकानात घडली आहे.
याप्रकरणी प्रकाश गोकुळराम कुमावत (वय ३८, रा. दत्तनगर चौक, उरुळी देवाची, ता. हवेली, जि. पुणे) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अंमलदार रामकिशन हंबर्डे आणि सतीश मोरे (रा. वडकी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमावत यांचे उरुळी देवाची येथील सह्याद्री चौकात पूजा ट्रेडर्स नावाचे किराणा दुकान आहे. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी पोलिस कर्मचारी आणि खासगी व्यक्ती असे दोघे दुकानात आले. ‘तू गुटखा विकतोस, तुझ्यावर गुन्हा दाखल करतो,’ अशी धमकी देत त्यांनी पाच लाख रुपयांची मागणी दुकानदाराकडे केली. दुकानदाराने एवढी रक्कम देणे शक्य नसल्याचे सांगितल्यानंतर त्यांच्याकडून १ लाख ६५ हजार रुपये घेतल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, दुकानदाराने याबाबत फुरसूंगी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी पोलिस कर्मचाऱ्यासह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेश खांडे करीत आहेत.
——————————————–
दुकानातील कॅमेऱ्यात संभाषण कैद…
दुकानातील कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला होता. तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दोघांच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पोलिस हंबर्डेचे संभाषण कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले आहे. सायबरचे कर्तव्य असताना देखील तो साद्या वेशात या दुकानात पोहचला होता. दुकानदाराचा नोकर घेऊन आलेला 1 लाख 65 हजार रुपये त्याने घेतले आहेत.त्यानंतर दुकानदाराच्या गुटख्याच्या गोण्यात त्याने परत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )
error: Content is protected !!