
महापालिकेच्या नोटिशीविरोधात जनता वसाहतीतील झोपडपट्टीधारकांचे ठिय्या आंदोलन!
१५ दिवसांत घरे-दुकाने हटविण्याच्या नोटिशीने नागरिकांमध्ये संताप; हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयात आंदोलन
हडपसर : पुणे महानगरपालिकेने रस्ता रुंदीकरणाच्या अनुषंगाने बजावलेल्या नोटिशीविरोधात हडपसर सर्व्हे क्रमांक १६५ मधील जनता वसाहतीतील झोपडपट्टीधारक आक्रमक झाले आहेत. या नोटिशीच्या निषेधार्थ नागरिकांनी हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. महापालिकेच्या नोटिशीमुळे अनेक कुटुंबांच्या घरांवर कारवाईची टांगती तलवार निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
हडपसर-मगरपट्टा ते साडेसतरा नळी येथील २४ मीटर रस्ता तसेच १२ मीटर रस्त्याच्या रुंदीकरणाच्या अनुषंगाने महापालिकेने बाधित मिळकतींचे सर्वेक्षण केले आहे. यामध्ये हडपसर सर्व्हे क्रमांक १६५ मधील जनता वसाहतीतील बाधित घरे व दुकानांचाही समावेश आहे. या सर्वेक्षणानंतर संबंधित मिळकतधारकांना हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.
नोटिशीनुसार, नोटीस मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणारी बांधकामे स्वतःहून काढून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अन्यथा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ अन्वये संबंधित घरे व दुकानांवर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
४० वर्षे महापालिकेचा कर भरला, मग आता घरे हटविण्याची नोटीस का?
जनता वसाहतीतील गणेश शिंदे, मारुती भिसे, अप्पा हुंभे, गणेश मधुकर तुपे, सुवर्णा सुरवसे, सविता जगताप, सुरेखा गायकवाड, रंजना तुपे, वंदना सायकर या नागरिकांचा प्रशासनाला सवाल आहे की, आम्ही गेल्या ४० वर्षांपासून येथे वास्तव्यास असून पुणे महानगरपालिकेचा नियमित मिळकतकर भरत आहोत. इतकी वर्षे महापालिका आमच्याकडून कर स्वीकारत होती, मग त्यावेळी आमच्या मिळकतींचा प्रश्न का उपस्थित केला नाही? ४० वर्षे कर स्वीकारल्यानंतर आता अचानक घरे हटविण्याच्या नोटिसा का बजावण्यात येत आहेत? कर स्वीकारताना महापालिकेला आमची घरे दिसत नव्हती का? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
मात्र, या नोटिशीमुळे जनता वसाहतीतील झोपडपट्टीधारकांच्या निवाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या कुटुंबांचे पुनर्वसन, पर्यायी निवास व्यवस्था आणि पात्रतेचे निकष याबाबत प्रशासनाने आधी स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून केली जात आहे.
आम्ही विकासाच्या विरोधात नाही; मात्र आमच्या निवाऱ्याचा प्रश्न आधी सोडवा. पुनर्वसनाची स्पष्ट हमी द्या आणि त्यानंतरच पुढील निर्णय घ्या, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
या ठिय्या आंदोलनात गणेश शिंदे, मारुती भिसे, अप्पा हुंभे, गणेश मधुकर तुपे, सुवर्णा सुरवसे, सविता जगताप, सुरेखा गायकवाड, रंजना तुपे आणि वंदना सायकर यांच्यासह जनता वसाहतीतील झोपडपट्टीधारक सहभागी झाले आहेत.
आता हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाचे प्रशासन या आंदोलनाची दखल घेऊन नागरिकांशी चर्चा करणार का? ४० वर्षांपासून कर भरणाऱ्या कुटुंबांच्या पुनर्वसनाबाबत काय निर्णय घेणार? या प्रश्नांची उत्तरे मिळण्याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

