बिगारी ते निवासी संपादक; संघर्षाचा प्रेरणादायी जीवनप्रवास!

बिगारी ते निवासी संपादक; संघर्षाचा प्रेरणादायी जीवनप्रवास!

‘जीवनगाथा’ ग्रंथाचे हडपसरमध्ये प्रकाशन; जिद्द, कष्ट आणि सचोटीच्या प्रवासाचे मान्यवरांकडून कौतुक

पुणे : परिस्थिती माणसाच्या वाट्याला संघर्ष देऊ शकते; मात्र त्या संघर्षाचे सोने करण्याची ताकद जिद्द, कष्ट आणि प्रामाणिकपणात असते. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करीत बिगारी कामगारापासून पत्रकारितेच्या क्षेत्रात निवासी संपादकपदापर्यंत मजल मारणारा प्रवास केवळ एका व्यक्तीची जीवनकहाणी नाही, तर स्वप्न पाहणाऱ्या आणि ती पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणेचा वस्तुपाठ आहे, अशा शब्दांत मान्यवरांनी डॉ. अशोक बालगुडे यांच्या जीवनप्रवासाचा गौरव केला.

‘जीवनगाथा… मातीच्या गंधापासून लेखणीच्या तेजापर्यंत…’ या ग्रंथाचे प्रकाशन हडपसर-गोंधळेनगर येथील कै. रामचंद्र बनकर महापालिका शाळेत उत्साहात झाले. याप्रसंगी नोबल हॉस्पिटल ट्रस्टचे प्रमुख डॉ. एम. बी. आबनावे, डॉ. सुहास पायगुडे, महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेचे संस्थापक रतन माळी, रमणलाल माध्यमिक विद्यालयचे बळीराम बडेकर, ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र बेल्हेकर, अनिल मोरे, कृष्णकांत कोबल, अशोक आव्हाळे, प्रमोद गिरी, विवेकानंद काटमोरे, दिगंबर माने, महादेव जाधव, अमोल भिंगारे, तुकाराम गोडसे, सुधीर मेथेकर, अॅड. सुनील गायकवाड, निवृत्त सहायक फौजदार बाबासाहेब करचे, मॉडर्न महाविद्यालयाचे प्रा. अडसुळे, प्रा. तृप्ती वाव्हळ, साधना विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव, ग्रंथपाल प्रदीप बागुल, प्रा. अनुराधा गेजगे, सेवानिवृत्त डीवायएसपी काशिनाथ तळेकर, डेवलप्ड नेशन्स लॉ न्यूजचे मनजोतसिंग, पत्रकार श्रेयश दहिवाल आदी उपस्थित होते. साहित्यिक, पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

साहित्यिक व लेखक प्रा. सतीश कुमदाळे म्हणाले, शाळा-महाविद्यालयीन शिक्षण, नोकरी, संसार आणि पुढील शिक्षण अशा अनेक जबाबदाऱ्यांचा समतोल साधत अडचणींवर मात करणे, हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. जिद्द, कष्ट, सचोटी आणि लोकांचा विश्वास संपादन करीत बिगारी कामगार ते निवासी संपादक असा प्रवास करणारे डॉ. बालगुडे यांचे जीवन नव्या पिढीला दिशा देणारे आहे. त्यांच्या जीवनगाथेत संघर्ष आहे; पण त्याहून अधिक जिद्दीचा आणि सकारात्मकतेचा प्रत्यय येतो.

दै. पुण्यनगरीचे संपादक श्रीकांत साबळे यांनी बालगुडे यांच्या पत्रकारितेतील कार्यशैलीचा गौरव केला. ते म्हणाले, बातमी, लेख, विशेष लेख आणि संपादकीय लेखन करताना विषयाचे बारकावे शोधून नेमकेपणाने मांडण्याची त्यांची हातोटी आहे. बातमी छोटी की मोठी, यापेक्षा तिचा आशय किती महत्त्वाचा आहे, याचे भान त्यांनी कायम जपले. २०१८ पासून त्यांची काम करण्याची पद्धत जवळून पाहिली आहे. स्वतः नवनवीन विषयांचा शोध घेण्याबरोबरच सहकाऱ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून दर्जेदार लेखन करून घेण्याची त्यांची धडपड विशेष उल्लेखनीय आहे.

प्रभाग समितीचे अध्यक्ष प्रशांतमामा तुपे म्हणाले, पत्रकार आणि बालगुडे हे समीकरण जवळून अनुभवले आहे. बारामती, मुंबई, पुणे आणि हडपसर येथे काम करताना त्यांनी कोणाचाही मुलाहिजा ठेवला नाही. अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे, नागरिकांना मार्गदर्शन करणे आणि हडपसरच्या विकासासाठी सातत्याने भूमिका मांडणे, हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे.

प्रवीण तुपे यांनी हडपसर स्वतंत्र महापालिका व्हावी, या मागणीसाठी बालगुडे यांनी केलेल्या पत्रकारितेचा उल्लेख केला. ते म्हणाले, या विषयावर त्यांनी वेळोवेळी चर्चा केली. लोकसत्ता, पुढारी, पुण्यनगरी, लोकमत, प्रभात, राष्ट्रसंचार आणि सकाळ अशा विविध दैनिकांतून स्वतंत्र महापालिकेच्या मागणीला त्यांनी सातत्याने वाचा फोडली. हडपसरच्या प्रश्नांसाठी लेखणीचा वापर करणे, ही येथील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे.

माजी नगरसेवक शिवाजी पवार म्हणाले, विठ्ठलनगर ग्रामपंचायतीपासून महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांपर्यंतच्या नागरी समस्यांचा शासनदरबारी पाठपुरावा करण्याचे काम बालगुडे यांनी बातम्यांच्या माध्यमातून केले. समाजाच्या हितासाठी बातमी असावी, ही त्यांची भूमिका त्यांच्या लेखनातून सातत्याने दिसून येते.

रायजिंग स्टार स्कूलच्या प्राचार्या योगेश्वरी कुमदाळे म्हणाल्या, विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यातील नाते अधिक घट्ट करून समाजाची जडणघडण करण्याचा त्यांचा विचार प्रेरणादायी आहे. आजही पालक या नात्याने शाळांमध्ये मार्गदर्शन करताना त्यांचा अभिमान वाटतो.

महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेच्या अध्यक्षा स्मिता वाघ यांनी बालगुडे यांच्या शिक्षणविषयक तळमळीचे कौतुक केले. विद्यार्थी आणि समाजाची जडणघडण होताना विचार आणि आचार यांची सांगड घालण्याचे महत्त्व त्यांच्या कार्यातून शिकता येते. बालवाडीपासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्येक स्तरावरील मुलांना केंद्रस्थानी ठेवून ते सातत्याने मार्गदर्शन करतात, असे त्यांनी सांगितले.

ज्येष्ठ पत्रकार सुभाष भारद्वाज यांनी शोधपत्रकारितेतील बालगुडे यांच्या योगदानाचा गौरव केला. बातमीतील नेमकेपणा शोधणे, तिचे प्रभावी सादरीकरण करणे आणि दुसऱ्या दिवशी त्याच विषयावर नवी बाजू मांडणे, ही पत्रकारितेतील कौशल्ये त्यांच्याकडून शिकण्यासारखी आहेत, असे भावोद्गार त्यांनी काढले.

सत्काराला उत्तर देताना डेवलप्ड नेशन्स लॉ न्यूजचे संपादक डॉ. अशोक बालगुडे म्हणाले की, सचोटी, जिद्द, सातत्य, कसोटी आणि काम करण्याची प्रामाणिक तयारी असेल, तर यश तुमच्यापासून दूर राहू शकत नाही. माझ्या आयुष्यातील संघर्षमय प्रवासातून मी हा अनुभव घेतला आहे. अडचणींचा पाढा वाचत बसण्यापेक्षा त्यावर मात करण्याची मानसिकता जोपासा. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी आत्मविश्वास आणि प्रयत्नांची दिशा योग्य असेल, तर मार्ग नक्की सापडतो. अपयश आले म्हणून खचून जाऊ नका; कारण अपयश ही यशाची पहिली पायरी असते. प्रत्येक अपयश आपल्याला काहीतरी शिकवते आणि पुढील यशासाठी अधिक सक्षम बनवते.
कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते; ते किती मनापासून आणि जबाबदारीने केले जाते, हे महत्त्वाचे असते. प्रत्येक कामात स्वतःला झोकून द्या, अभ्यासाची सवय लावा आणि ज्ञानाची भूक कायम ठेवा. केवळ स्वप्ने पाहून यश मिळत नाही, तर त्या स्वप्नांसाठी कष्ट, शिस्त आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची जोड द्यावी लागते. यशस्वी होण्यासाठी नशिबापेक्षा मेहनतीवर विश्वास ठेवा. स्वतःची क्षमता ओळखा, संधीची वाट पाहण्यापेक्षा संधी निर्माण करा आणि प्रत्येक आव्हानाकडे शिकण्याची संधी म्हणून पाहा. प्रामाणिक प्रयत्नांना पर्याय नाही; आजचे कष्टच उद्याच्या यशाचा भक्कम पाया ठरतात, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.

रोटरी क्लब ऑफ पुणे मगरपट्टा एलाईटच्या माजी अध्यक्षा अर्चना गोजमगुंडे यांनी सूत्रसंचालन केले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!