बदल्यांच्या धोरणाविरोधात कामगारांचा आक्रोश; मनपा भवनावर आंदोलन

बदल्यांच्या धोरणाविरोधात कामगारांचा आक्रोश; मनपा भवनावर आंदोलन

कायम कामगारांच्या हद्दी काढून कंत्राटी कामगारांची नियुक्ती

पुणे : पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून कायम कामगारांच्या झाडण कामाच्या हद्दी काढून घेऊन त्या ठिकाणी नवीन कंत्राटी कामगारांची नियुक्ती केली जात असल्याचा आरोप पुणे महानगरपालिका कामगार युनियनने केला आहे. तसेच अनेक कायम कामगारांना त्यांच्या नेहमीच्या कामाच्या ठिकाणापासून दूरच्या कोठ्यांवर आणि अन्य ठिकाणी बदल्या करण्यात येत असल्याने कामगारांमध्ये नाराजी आहे.

कायम कामगारांना त्यांच्या नियमित कामापासून दूर करून कंत्राटी कामगारांना संधी देण्याचे धोरण राबविले जात असल्याने कामगारांवर अन्याय होत असल्याचे युनियनचे म्हणणे आहे. लांबच्या ठिकाणी बदल्या केल्यामुळे कामगारांना प्रवासाचा अतिरिक्त त्रास तसेच आर्थिक भार सहन करावा लागत आहे.

या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी शनिवारी (२९ ऑगस्ट) श्रमिक भवन येथे कायम कामगारांची सभा घेण्यात आली. सभेत प्रशासनाच्या धोरणाचा निषेध करून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात आली.

मनपा भवनावर आंदोलन

कायम कामगारांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी (८ सप्टेंबर) दुपारी तीन वाजता मनपा भवन येथे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात महानगरपालिकेतील सर्व कायम कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) यांच्या वतीने करण्यात आले आहे.

कायम कामगारांच्या हक्कांवर गदा आणणारे निर्णय मागे घेऊन कामगारांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार सभेत करण्यात आला.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!