स्मार्ट सिटीतील ‘स्मार्ट’ चेंबर; दुरुस्तीचा प्रश्न कायम

स्मार्ट सिटीतील ‘स्मार्ट’ चेंबर; दुरुस्तीचा प्रश्न कायम

गेणुजी सातव चौकात दोन दिवसांपासून मैलापाणी रस्त्यावर; वारंवार तुंबणाऱ्या वाहिनीवर कायमस्वरूपी उपायाची मागणी

हडपसर : प्रभाग क्रमांक ४१ मधील हांडेवाडी रस्त्यावरील कै. अॅड. गेणुजी सातव चौकात मैलापाणी वाहून नेणारी वाहिनी तुंबल्याने गेल्या दोन दिवसांपासून मैलापाणी रस्त्यावरून वाहत आहे. पादचारी आणि वाहनचालकांना याच सांडपाण्यातून मार्गक्रमण करावे लागत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

या समस्येबाबत कोंढवा-उंड्री क्षेत्रीय कार्यालयाच्या ड्रेनेज विभागाला माहिती देण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, तातडीने निचरा करण्याची कार्यवाही झालेली नसल्याची तक्रार हांडेवाडी रस्ता, महमंदवाडी रस्ता, सय्यदनगर आणि ससाणेवस्ती परिसरातील नागरिकांनी केली आहे.

दर आठवड्याला तुंबणारे चेंबर

गेणुजी सातव चौकातील चेंबर वारंवार तुंबत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. तुंबलेले चेंबर मोकळे करण्यासाठी वेळोवेळी दुरुस्ती केली जाते; मात्र काही कालावधीनंतर पुन्हा त्याच ठिकाणी सांडपाण्याची समस्या निर्माण होत असल्याचे नागरिक सांगतात.

त्यामुळे ‘स्मार्ट सिटी’च्या नावाला साजेशी कायमस्वरूपी जलनिस्सारण व्यवस्था नेमकी कधी होणार? असा उपरोधिक सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. वारंवार होणाऱ्या तात्पुरत्या दुरुस्तीऐवजी वाहिनी तुंबण्याचे मूळ कारण शोधून त्यावर तांत्रिक उपाय करणे आवश्यक असल्याची स्थानिक नागरिक अर्जुन सातव यांची मागणी आहे.

रस्त्यावरून वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे दुर्गंधी आणि अस्वच्छता निर्माण झाली असून, सार्वजनिक आरोग्याबाबतही चिंता व्यक्त होत आहे. वाहनांच्या वाहतुकीमुळे हे पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडत असल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

तक्रारीसाठीही नागरिकांची धावपळ

कोंढवा-उंड्री क्षेत्रीय कार्यालय सावंत चौक-कात्रज परिसरात असल्याने स्थानिक नागरिकांना तक्रारीसाठी लांबचा प्रवास करावा लागत असल्याचे सांगण्यात आले. त्यात कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, ड्रेनेज विभागातील कनिष्ठ अभियंत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

वारंवार तुंबणाऱ्या वाहिनीची तातडीने पाहणी करून सांडपाण्याचा निचरा करावा, चेंबर व वाहिनीची तांत्रिक तपासणी करावी आणि पुनरावृत्ती टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!