
आयुक्तांच्या परिपत्रकानंतरही हडपसर-मांजरी कार्यालयात दिवाळी भेटवस्तू देण्याचा प्रयत्न?
पुणे : पुणे महानगरपालिका आयुक्तांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संबंधित दिवाळी भेटवस्तू स्वीकारण्याबाबत परिपत्रक जारी केलेले असतानाही, हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयात दिवाळी भेटवस्तू देण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी साधारण ५ वाजण्याच्या सुमारास काही व्यक्तींकडून हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
महापालिका आयुक्तांनी यापूर्वीच यासंदर्भात परिपत्रक काढलेले असताना अशा प्रकारे भेटवस्तू देण्याचा प्रयत्न झाल्याने या घटनेची चर्चा सुरू झाली आहे.
महापालिकेच्या परिपत्रकानुसार मुख्य इमारतीसह सर्व विभागीय, क्षेत्रीय आणि उपकार्यालयांच्या परिसरात भेटवस्तू आणणे, स्वीकारणे व वाटप करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम १२ चा संदर्भ देत नियमभंग करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
आता सहाय्यक आयुक्तांसमोर महत्त्वाचे प्रश्न
* भेटवस्तू घेऊन आलेल्या व्यक्तींना कार्यालयात प्रवेश कसा मिळाला?
* सुरक्षा विभागाने आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी केली का?
* संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी भेटवस्तू स्वीकारल्या का?
* कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासून वस्तुस्थितीची खातरजमा केली जाणार का?
* आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई होणार का?
आता हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांनी या प्रकाराची दखल घेऊन चौकशी करावी आणि आयुक्तांच्या परिपत्रकाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
विशेष : भेटवस्तू देण्याचा प्रयत्न झाला, ही बाब आणि प्रत्यक्ष भेटवस्तू स्वीकारण्यात आल्या का, या दोन स्वतंत्र बाबी असून चौकशीतूनच वस्तुस्थिती स्पष्ट होईल.

