
दोन महिन्यांपूर्वीचे पॅचवर्कही खचले; रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह!
हडपसर : अवघ्या दोन महिन्यांपूर्वी ज्या ठिकाणी पॅचवर्क करण्यात आले, त्याच ठिकाणी पुन्हा खड्डा पडल्याने महापालिकेच्या रस्ते कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काळबोराटेनगर येथील न्हावलेवाडा चौकातील हा प्रकार समोर आल्यानंतर दोन महिन्यांतच पॅचवर्कची अशी अवस्था होत असेल, तर कामात कोणत्या दर्जाचे साहित्य वापरण्यात आले होते? पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी कामाची गुणवत्ता तपासली होती का? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
रस्त्यावरील खड्ड्यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत असून, विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा खड्डा धोकादायक ठरत आहे. खड्डे बुजविण्यासाठी केलेले पॅचवर्कच दोन महिन्यांत उखडत असेल, तर महापालिकेच्या रस्ते दुरुस्तीच्या कामांचा दर्जा नेमका काय? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
दोन महिन्यांतच पॅचवर्कची पोलखोल
संबंधित ठिकाणी दोन महिन्यांपूर्वीच पॅचवर्क करण्यात आले होते. मात्र, अल्पावधीतच त्याच ठिकाणी पुन्हा खड्डा पडल्याने पॅचवर्कसाठी वापरण्यात आलेले साहित्य, त्याची प्रक्रिया आणि कामाची गुणवत्ता याबाबत शंका उपस्थित होत आहेत.
पॅचवर्क करण्यापूर्वी रस्त्याचा खचलेला भाग योग्य पद्धतीने खोदून त्यामध्ये आवश्यक साहित्याचा थर देण्यात आला होता का? त्याची योग्य पद्धतीने दबाई करण्यात आली होती का? डांबराची गुणवत्ता तपासण्यात आली होती का? की केवळ खड्डा बुजवून काम पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आले? असा सवाल नागरिकांकडून होत आहे.
अधिकाऱ्यांची गुणवत्ता तपासणी कागदावरच?
महापालिकेच्या पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी पॅचवर्कच्या वेळी प्रत्यक्ष पाहणी केली होती का? वापरण्यात आलेल्या साहित्याची गुणवत्ता तपासण्यात आली होती का? काम पूर्ण झाल्यानंतर त्याची पाहणी करण्यात आली होती का? जर गुणवत्ता तपासणी झाली असेल, तर अवघ्या दोन महिन्यांत त्याच ठिकाणी पुन्हा खड्डा पडला कसा? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
महापालिकेच्या निधीतून होणाऱ्या कामांवर नागरिकांच्या कराचा पैसा खर्च होतो. त्यामुळे निकृष्ट काम करून पुन्हा त्याच ठिकाणी दुरुस्ती करण्याचे चक्र थांबविण्याची गरज आहे. संबंधित कामाची चौकशी करून दोष आढळल्यास कंत्राटदारासह जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
‘पुन्हा थातूरमातूर डागडुजी नको’
खड्डा पडल्याचे लक्षात आल्यानंतर पुन्हा पॅचवर्क करून विषय संपविण्याऐवजी मूळ कारण शोधून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
“दोन महिन्यांपूर्वी केलेले पॅचवर्क पुन्हा खचते, याचा अर्थ कामाच्या गुणवत्तेची तपासणी आवश्यक आहे. नागरिकांच्या पैशातून वारंवार अशीच डागडुजी करण्याऐवजी जबाबदारी निश्चित करा,” अशी भूमिका नागरिकांनी व्यक्त केली.
‘तक्रारीचे तातडीने निवारण करू’
हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त कुणाल धुमाळ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
पथ विभागाचे कनिष्ठ अभियंता संदीप दीपके यांच्याशी संपर्क साधला असता, “आठ दिवसांपूर्वीच माझी बदली होऊन येथे रुजू झालो आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करतो. संबंधित तक्रारीचे तातडीने निवारण केले जाईल,” असे त्यांनी सांगितले.
मात्र, दोन महिन्यांपूर्वी केलेले पॅचवर्क पुन्हा खचण्यामागचे नेमके कारण काय, याची चौकशी करून संबंधितांवर जबाबदारी निश्चित होणार का? हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.
पॅचवर्कच्या नावाखाली केवळ खड्डे बुजवायचे आणि काही दिवसांनी पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे पडायचे, हा प्रकार कधी थांबणार? असा संतप्त सवाल काळे-बोराटेनगरमधील नागरिकांकडून केला जात आहे.

