
घोरपडीत विसर्जन मिरवणुकीत ट्रॉलीखाली येऊन १८ वर्षीय हलगी वादकाचा मृत्यू
घोरपडी : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान घोरपडी परिसरातील बी. टी. कवडे मार्गावर शुक्रवारी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात १८ वर्षीय हलगी वादकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. विघ्नेश पवार (वय १८, रा. ७वा मजला, आदिनाथ सोसायटी, रामटेकडी, हडपसर) असे मृत युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बी. टी. कवडे मार्गावर गणेश विसर्जन मिरवणूक सुरू होती. यावेळी रामटेकडी येथील हलगी वादक विघ्नेश पवार हा एका गणेश मंडळाच्या ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉलीच्या मागील बाजूस बसला होता.
मिरवणूक काळूबाई चौक परिसरात आली असता विघ्नेश हा ट्रॉलीच्या चाकाखाली आल्याची घटना घडली. या अपघातात ट्रॉलीचे चाक त्याच्या छातीवरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.
या दुर्दैवी घटनेमुळे विसर्जन मिरवणुकीदरम्यान सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुंढवा पोलिसांनी आवश्यक कार्यवाही सुरू केली असून, अपघाताबाबत पुढील तपास सुरू आहे.

