‘बिग बॉस’ फेम दिव्या शिंदेकडून डॉक्टरवर जीवघेणा हल्ला करत खंडणीची मागणी !

‘बिग बॉस’ फेम दिव्या शिंदेकडून डॉक्टरवर जीवघेणा हल्ला करत खंडणीची मागणी !

पुणे , सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका सांस्कृतिक महोत्सवाचे विनापरवानगी प्रमोशन केल्याचा दावा करून पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे निवृत्त मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड (वय 65) यांच्याकडे तब्बल पाच लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. एवढेच नव्हे तर घरात घुसून त्यांना अमानुष मारहाण करत त्यांची कारही पळवून नेल्याची घटना घडली आहे. या गंभीर प्रकरणी ‘बिग बॉस मराठी’ फेम सोशल मीडिया स्टार दिव्या शिंदे (रा. सनसिटी, सिंहगड रस्ता), तिचा साथीदार आण्णा ढमढेरे (रा. पिंपरी) यांच्यासह आठ ते दहा जणांविरोधात काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. विद्याधर गायकवाड हे 2021 मध्ये पुणे कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमधून मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून निवृत्त झाले असून ते करुणादीप फाउंडेशन या संस्थेचे सदस्य आहेत. संस्थेच्या वतीने 1 ते 3 सप्टेंबर या कालावधीत बालगंधर्व रंगमंदिरात ‘कला आविष्कार महोत्सव’ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे कोणतेही अधिकृत आमंत्रण अथवा प्रसिद्धीची जबाबदारी दिव्या शिंदे हिला देण्यात आलेली नव्हती. तरीही तिने ऑगस्ट महिन्यापासून महोत्सवाची प्रसिद्धी केल्याचा बहाणा करून डॉ. विद्याधर गायकवाड यांच्याकडे दूरध्वनी आणि संदेशांद्वारे पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी लावून धरली होती.

या त्रासाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत गेली. 17 सप्टेंबर रोजी दिव्या शिंदे आणि आण्णा ढमढेरे यांनी काही साथीदारांसह तक्रारदारांच्या घरी जाऊन कुटुंबियांना धमकावले. त्यानंतर 23 सप्टेंबर रोजी हॉटेल ब्ल्यू नाईन येथे डॉ. गायकवाड यांना बोलावून पैसे न दिल्यास गंभीर परिणामांची धमकी देण्यात आली. अखेर 24 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास डॉ. गायकवाड घरी एकटे असताना आरोपींनी घरात शिरून रानटी हल्ला चढवला.

पक्षाघाताचे रुग्ण असल्याने मारहाण न करण्याची विनंती डॉ. गायकवाड करत होते. मात्र हल्लेखोरांनी त्यांचे काहीही न ऐकता लाथाबुक्क्यांनी, पट्ट्याने, दांडक्याने आणि लोखंडी भांड्याने मारहाण केली. एकाने धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यावर वार केला. कुटुंबियांना तुकडे करण्याची धमकी देत आरोपींनी घरातील साहित्याची तोडफोड केली आणि त्यांची चारचाकी कार बळजबरीने घेऊन पोबारा केला. गंभीर जखमी झालेल्या डॉक्टरांवर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला असून सहायक पोलिस निरीक्षक अमित शेटे पुढील तपास करत आहेत.

प्रसिद्धीच्या झोतात असणाऱ्या व्यक्तींकडून ज्येष्ठ नागरिकांवर अशा प्रकारे दहशतीचा वापर करून खंडणी उकळण्याचे प्रयत्न होणे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. कायदा हातात घेणाऱ्या अशा समाजकंटकांवर पोलिसांनी कोणत्याही दबावाशिवाय कडक आणि निष्पक्ष कारवाई करणे गरजेचे आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!