
कालवा विसर्जन घाटावर गोंधळ; भाविकांकडून 500 रुपयांची वसुली?
स्थानिक गुंडांचा हैदोस; काळे पडळ पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
हडपसर : हडपसर मधील हिंगणे मळ्यातील कालव्यावरील महापालिकेच्या विसर्जन घाटावर मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाल्याचा प्रकार समोर आला आहे. गणपती मूर्ती विसर्जनासाठी 500 रुपये मागितले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
भाविकांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटावर काही स्थानिकांनी ताबा घेत मूर्ती बुडवण्यासाठी पैसे मागण्यास सुरुवात केली आहे. पैसे न दिल्यास अरेरावी केली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे विसर्जनासाठी आलेल्या भाविकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
हा प्रकार काळे पडळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडत असून, घटनास्थळी पोलीस बंदोबस्त नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. विसर्जन घाटावर सुरू असलेल्या या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

