
सय्यद नगरमध्ये पुन्हा ड्रेनेज तुंबले; नागरिकांचा संताप शिगेला
League of Legends released a new update for their hero Vel’Koz. You may need to check this update now.
मना न्यूज नेटवर्क
हडपसर- महंमदवाडी परिसरातील सय्यद नगर येथे गेल्या अनेक वर्षांपासून वारंवार ड्रेनेज तुंबण्याच्या घटना घडत असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिसरातील काही अनधिकृत हॉटेल व्यवसायांमुळे ड्रेनेज लाईनमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा, अन्नपदार्थांचे अवशेष आणि तेलकट सांडपाणी सोडले जात असल्याने ड्रेनेज वारंवार जाम होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
ड्रेनेज तुंबल्यामुळे सांडपाणी थेट मुख्य रस्त्यावर वाहू लागले असून परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. रस्त्यांवर साचलेले घाण पाणी आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना याचा सर्वाधिक फटका बसत असून डासांचे प्रमाण वाढल्याने डेंग्यू, मलेरिया आणि इतर साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ही समस्या नवीन नसून गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. नागरिकांनी अनेक वेळा पुणे महानगरपालिकेकडे तक्रारी करूनही प्रशासनाकडून केवळ तात्पुरत्या उपाययोजना केल्या जातात. ड्रेनेज साफ करून किंवा अडथळे दूर करून काही दिवसांसाठी प्रश्न मिटवला जातो, मात्र कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात नसल्याने परिस्थिती पुन्हा जैसे थे होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
विशेष म्हणजे, 10 मे 2026 रोजी देखील याच ठिकाणी ड्रेनेज तुंबल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी नागरिकांनी कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली होती. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने काम हाती घेऊन समस्या कायमस्वरूपी सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्या आश्वासनानंतर अवघ्या काही दिवसांतच पुन्हा ड्रेनेज तुंबल्याची घटना घडल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागरिकांचा आरोप आहे की, काही विशिष्ट हॉटेलसमोरील ड्रेनेजच वारंवार जाम होत असताना संबंधित व्यावसायिकांवर कोणतीही कठोर कारवाई होत नाही. त्यामुळे अनधिकृत व्यवसायांवर प्रशासन मेहरबान आहे का, असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. वारंवार एकाच कारणामुळे समस्या निर्माण होत असतानाही दोषींवर कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.
दरम्यान, काही दिवसांतच पावसाळा सुरू होणार आहे. मात्र परिसरातील नालेसफाई आणि ड्रेनेज सफाईची कामे अद्यापही अपुरी असल्याचे चित्र आहे. पावसाळ्यात ड्रेनेज तुंबण्याचे प्रमाण वाढल्यास रस्त्यांवर पाणी साचणे, घरांमध्ये सांडपाणी शिरणे आणि साथीचे आजार पसरण्याचा धोका अधिक वाढणार असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
याबाबत स्थानिक नगरसेवकांनाही अनेक वेळा माहिती देण्यात आली. मात्र त्यांच्याकडूनही केवळ आश्वासनांशिवाय कोणतीही ठोस कृती झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. “निवडणुकीपूर्वी विकासाची मोठमोठी आश्वासने दिली जातात, मात्र प्रत्यक्षात नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी कोणीही पुढे येत नाही,” अशी तीव्र नाराजी स्थानिकांनी व्यक्त केली.
सय्यद नगरमधील नागरिक आता थेट प्रश्न विचारत आहेत की, “नागरिकांच्या आरोग्याशी आणि जीवनाशी पुणे महानगरपालिका खेळत आहे का?” वारंवार तक्रारी करूनही समस्या कायम राहणे आणि पावसाळ्याच्या तोंडावरही कोणतीही प्रभावी उपाययोजना न होणे, ही प्रशासनाच्या निष्क्रियतेची साक्ष असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
स्थानिकांनी प्रशासनाकडे तातडीने ड्रेनेज व्यवस्थेची सखोल पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची, अनधिकृत हॉटेल व्यवसायांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची तसेच पावसाळ्यापूर्वी नालेसफाई व ड्रेनेज सफाईची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

