
प्रेमाच्या आमिषाने लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या तरुणीची आत्महत्या
पुणे : प्रेमाच्या आमिषाने पुण्यात आणून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असताना तरुणीची बचत, दागिने स्वतःच्या फायद्यासाठी वापरणे, व्यसनासाठी पैशांची मागणी करत वारंवार मारहाण व मानसिक छळ केल्याच्या आरोपांमुळे २५ वर्षीय तरुणीने सुसाईड नोट लिहून गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आंबेगाव पठार येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
मृत तरुणीचे नाव मनीषा महादू गांडले (वय २५) असे असून, तिच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून साहिल मनोज आडसूळ (वय २८, रा. गजानन कॉलनी, साईसिद्धी चौकाजवळ, आंबेगाव पठार) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२२ मध्ये साहिल आडसूळ याने मनीषाला प्रेमाचे आश्वासन देत पुण्यात आणले. त्यानंतर दोघे आंबेगाव पठार येथे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. या काळात आरोपीने मनीषाच्या बचतीची रक्कम आणि सोन्याचे दागिने स्वतःच्या वापरासाठी खर्च केल्याचा आरोप आहे. तसेच व्यसनासाठी वारंवार पैशांची मागणी करून नकार दिल्यास तिचा शारीरिक व मानसिक छळ करत मारहाण केली जात होती.
या सततच्या त्रासाला आणि प्रेमातील कथित फसवणुकीला कंटाळून मनीषाने २७ जून रोजी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये होत असलेल्या छळाचा उल्लेख असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
आंबेगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक डोईफोडे करीत आहेत.

