कर्जमाफीच्या शब्दावर सरकारचा विश्वासघात; मोठ्या एल्गारचा इशारा!

कर्जमाफीच्या शब्दावर सरकारचा विश्वासघात; मोठ्या एल्गारचा इशारा!

पंढरपूरच्या विठ्ठलाच्या साक्षीने दिलेले आश्वासन पाळले नाही; छत्रपती संभाजीनगरात हजारो शेतकऱ्यांचा संताप

छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी देण्याबाबत पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पवित्र भूमीत सरकारने दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार एल्गार पुकारला. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या या आंदोलनात मराठवाड्यातील हजारो शेतकरी सहभागी झाले होते. सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप करत आंदोलकांनी तीव्र घोषणाबाजी केली.

या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ज्येष्ठ नेते अनिल देशमुख, खासदार निलेश लंके, खासदार कल्याण काळे, खासदार अमर काळे, खासदार बजरंग सोनवणे, राजेश टोपे, आमदार संदीप क्षीरसागर, सलील देशमुख, माजी आमदार सुनील भुसारा यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक आजी-माजी पदाधिकारी व हजारो शेतकरी उपस्थित होते.

आंदोलनादरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी दूरध्वनीवर संपर्क साधून मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक आयोजित करून कर्जमाफी योजनेतील अटी-शर्ती हटविण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे नियोजन केले जाईल, असे आश्वासन दिले. यापूर्वी पंढरपूरमध्ये दिलेला शब्द सरकारने पाळला नसल्याची खंत व्यक्त करत, मंत्रिपदाचा मान राखण्यासाठी आणि आंदोलनामुळे अडकलेल्या सामान्य नागरिकांसह सकाळपासून बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसांच्या गैरसोयीचा विचार करून आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले.

मात्र, उद्याच्या बैठकीत ठोस निर्णय झाला नाही किंवा पुन्हा एकदा शब्द फिरविला गेला, तर सरकारवर पुन्हा कधीही विश्वास ठेवला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देण्यात आला. तसेच, राज्यभर यापेक्षाही अधिक व्यापक आणि तीव्र आंदोलन छेडून शेतकऱ्यांची ताकद सरकारला दाखवून देण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न आता केवळ आर्थिक नसून सरकारच्या विश्वासार्हतेशी जोडला गेला आहे. त्यामुळे मुंबईतील प्रस्तावित बैठकीत काय निर्णय होतो, याकडे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!