
हडपसरच्या काळे-बोराटे नगरमध्ये वटपौर्णिमा उत्साहात साजरी
सुवासिनींनी वडाच्या वृक्षाची पूजा करून अखंड सौभाग्याची केली प्रार्थना
पुणे : हडपसर परिसरातील काळे-बोराटे नगर येथे वटपौर्णिमा उत्सव भक्तीभाव आणि पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. परिसरातील सुवासिनी महिलांनी पारंपरिक वेशभूषेत वडाच्या वृक्षाची विधीवत पूजा करून अखंड सौभाग्य, पतीच्या दीर्घायुष्य व कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. वटपौर्णिमा हा सावित्री-सत्यवानाच्या अखंड निष्ठेचे प्रतीक मानला जाणारा महत्त्वाचा सण आहे.
पहाटेपासूनच महिलांनी वडाच्या वृक्षाभोवती फेऱ्या मारून पवित्र धागा गुंडाळला. पूजा, आरती आणि पारंपरिक व्रतविधी पार पाडत एकमेकींना हळदी-कुंकू लावून शुभेच्छा दिल्या. या निमित्ताने परिसरात धार्मिक आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक संस्कृती आणि सामाजिक ऐक्य जपणारा हा उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

