यवत पोलीस स्टेशन हद्दीत विजेचा धक्का लागून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

यवत पोलीस स्टेशन हद्दीत विजेचा धक्का लागून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

राहू (ता. दौंड) :

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील राहू गावात आज सकाळी सुमारे ७.०० वाजण्याच्या सुमारास विजेचा धक्का लागून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक महिला जखमी झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, भोइटे यांच्या जनावरांच्या गोठ्याबाहेर कपडे वाळत घालण्यासाठी लावलेल्या लोखंडी तारेला वीजप्रवाह आला होता. या तारेला स्पर्श झाल्याने रोहित अनिल भोइटे (वय २०), ओम नितीन भोइटे (वय १८) आणि सोनाली नितीन भोइटे (वय ४०) हे तिघेही बेशुद्ध अवस्थेत आढळले.

स्थानिकांनी तातडीने तिघांना राहू येथील आरोग्य सेवा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. तेथे सोनाली नितीन भोइटे यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, रोहित अनिल भोइटे आणि ओम नितीन भोइटे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी यवत ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे सकाळी सुमारे ८.०० वाजता डॉक्टरांनी तपासणी करून दोघांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.

या घटनेची नोंद यवत पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक (PSI) मोरे करीत आहेत. घटनेमुळे राहू गावात शोककळा पसरली आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!