हडपसरमध्ये शिवसेनेचा हल्लाबोल; अवैध हातभट्ट्या जमीनदोस्त

हडपसरमध्ये शिवसेनेचा हल्लाबोल; अवैध हातभट्ट्या जमीनदोस्त

पुणे : विषारी दारूमुळे निष्पाप नागरिकांचे बळी जात असताना हडपसर परिसरात काही दारू माफिया खुलेआम बनावट गावठी दारूच्या हातभट्ट्या चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने शुक्रवारी आक्रमक भूमिका घेत थेट रस्त्यावर उतरून अवैध दारू व्यवसायाविरोधात जोरदार हल्लाबोल केला. कृष्णानगर, तरवडे वस्ती पोलीस चौकीच्या पाठीमागील परिसर तसेच साठे वस्ती भागात सुरू असलेल्या अवैध हातभट्ट्यांवर धडक कारवाई करत शेकडो लिटर बनावट गावठी दारूचा साठा नष्ट करण्यात आला.

विषारी दारूमुळे अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असताना हडपसरमध्येच अवैध दारूचे साम्राज्य बिनधास्तपणे सुरू असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सामान्य नागरिकांना या हातभट्ट्या सहज दिसत असताना संबंधित यंत्रणांना त्या दिसत नाहीत का, असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या बेकायदेशीर धंद्यांमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून युवक व्यसनाधीनतेच्या गर्तेत ढकलले जात आहेत. विषारी दारूमुळे १५ नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतरही जर अशा अवैध भट्ट्या सुरू राहत असतील, तर ही केवळ प्रशासनाची निष्क्रियता नसून नागरिकांच्या जीवाशी खेळण्यासारखी बाब असल्याची तीव्र भावना व्यक्त करण्यात आली.

शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, हडपसर हा दारू माफियांचा अड्डा नसून कष्टकरी, प्रामाणिक आणि कायद्याचा सन्मान करणाऱ्या नागरिकांचा परिसर आहे. त्यामुळे अवैध दारू विक्री, हातभट्ट्या आणि इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधातील लढा यापुढे अधिक तीव्र करण्यात येणार आहे. नागरिकांच्या आरोग्याशी आणि सुरक्षिततेशी खेळणाऱ्या प्रत्येक माफियाचा पर्दाफाश करून त्यांचे अवैध साम्राज्य उद्ध्वस्त केल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

प्रशासनाला थेट सवाल

– विषारी दारूमुळे मृत्यू झाल्यानंतरही अवैध हातभट्ट्या सुरू कशा?
– सामान्य नागरिकांना दिसणारे धंदे प्रशासनाला का दिसत नाहीत?
– दारू माफियांना नेमके कोणाचे संरक्षण आहे?
– नागरिकांच्या जीवाची जबाबदारी कोण घेणार?

या आंदोलनात पुणे शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे, प्रवीण हिलगे, विक्रम घाडगे, रोहित भालचिंम, प्रकाश कालगुडे, गणेश साळुंखे, माऊली साळुंखे, रवी लोखंडे, सुरज खिल्लारे यांच्यासह शेकडो शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

इशारा

“हडपसरमध्ये अवैध दारू विक्री करणाऱ्या आणि जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या माफियांना यापुढे कोणतीही माफी नाही. प्रशासनाने कठोर कारवाई केली नाही, तर जनआंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )
error: Content is protected !!