पत्नीला चावा घेतल्याच्या रागातून झोपलेल्या भटक्या श्वानाला काठीने मारहाण; श्वानाचा मृत्यू, एकावर गुन्हा दाखल

पत्नीला चावा घेतल्याच्या रागातून झोपलेल्या भटक्या श्वानाला काठीने मारहाण; श्वानाचा मृत्यू, एकावर गुन्हा दाखल

पुणे : पत्नीला श्वानाने चावा घेतल्याच्या रागातून झोपलेल्या भटक्या श्वानाला काठीने अमानुष मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना हडपसरमधील महंमदवाडी परिसरात घडली. याप्रकरणी काळेपडळ पोलिसांनी शिवा सुभाष कोबळकर (वय ४०, रा. कृष्णानगर, महंमदवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना २२ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कृष्णानगर येथील हिंदवी स्वराज्य मित्र मंडळासमोरील रस्त्यावर घडली. याबाबत शुभम बालाजी पोटेवाड (वय २४) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित भटका श्वान गेल्या २१ वर्षांपासून या परिसरात राहत होता. या श्वानाने कोबळकर यांच्या पत्नीला चावा घेतला होता. त्याचा राग मनात धरून कोबळकर याने दुपारी झोपलेल्या श्वानाला काठीने बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत श्वानाचा मृत्यू झाला.

याप्रकरणी प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करणाऱ्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास सुतार पुढील तपास करत आहेत.

या घटनेमुळे भटक्या श्वानांच्या सुरक्षेचा आणि प्राण्यांवरील अत्याचाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!