मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने राज्यभर विशेष शिबिरे

मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने राज्यभर विशेष शिबिरे

माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त २२ ते ३१ जुलैदरम्यान पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिका वितरण मोहिम*

मुंबई,

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दि. २२ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत राज्यभर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या विशेष मोहिमेद्वारे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना उपलब्ध इष्टांकाच्या मर्यादेत नव्याने शिधापत्रिका वितरित करण्यात येणार आहेत.

शासनाचे विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. “एकही पात्र लाभार्थी अन्नसुरक्षा योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये” हा उद्देश समोर ठेवून पात्र लाभार्थ्यांचा राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत तातडीने समावेश करण्यासाठी ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

दि. २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत केंद्र शासनाकडून प्राप्त इष्टांकाची जिल्हानिहाय पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यानुसार उपलब्ध इष्टांकाचा प्रभावी वापर करून पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिका वितरित करण्यासाठी दि. २० जुलै २०२६ रोजी सर्व संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

या विशेष मोहिमेदरम्यान राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमांतर्गत पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज स्वीकारणे, त्यांची तात्काळ पडताळणी करणे, पात्रता निश्चित करणे तसेच संबंधित जिल्ह्यास उपलब्ध इष्टांकाच्या मर्यादेत नवीन शिधापत्रिका मंजूर करून त्यांचे वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
या मोहिमेमुळे पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिका मिळण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल, उपलब्ध इष्टांकाचा प्रभावी वापर होईल आणि शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत अधिक वेगाने व प्रभावीपणे पोहोचण्यास मदत होईल.

राज्यातील पात्र नागरिकांनी या विशेष शिबिरांचा लाभ घेऊन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत, असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!