
सत्यपुरम चौकात सिग्नल बसणार, डिव्हायडर खुला होणार
हडपसर : फुरसुंगी-गोंधळेनगर परिसरातील सत्यपुरम (तुकाईदर्शन) चौकात दररोज निर्माण होणारी वाहतूक कोंडी, वारंवार होणारे अपघात आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. नागरिकांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत वाहतूक विभागाने चौकात वाहतूक सिग्नल बसविणे, सत्यपुरम सोसायटीसमोरील डिव्हायडर खुला करणे आणि वाहतुकीचे शास्त्रोक्त नियोजन करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी डिव्हायडर उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे, वाहतूक सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण जाधव, नगरसेवक ॲड. अमोल कापरे, नगरसेविका प्राचीताई देशमुख तसेच शिवप्रसाद देशमुख, प्रवीण आटोळे, दिपक वाडकर, बापू राजिवडे, सागर तुपे, उल्हास तुपे, कांतिलाल गदादे, दादा शेवते आणि भोईटे मामा यांच्या उपस्थितीत संयुक्त स्थळ पाहणी करण्यात आली. पाहणीनंतरच उपायुक्तांनी संबंधित विभागाला तातडीने कार्यवाहीचे तोंडी आदेश दिले.
पाहणीदरम्यान शनी मंदिर चौक आणि पुणे-सासवड रस्त्यावरील वाढती वाहतूक कोंडी, शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनचालकांना होत असलेला त्रास तसेच अपघातांचा धोका यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर चौकातील वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
या प्रश्नासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे निवेदन देण्यात आले होते. वाहतूक सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण जाधव यांनी डिव्हायडर खुला करण्याबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला होता. नगरसेविका प्राचीताई देशमुख यांनीही सातत्याने पाठपुरावा केला. या एकत्रित प्रयत्नांना अखेर यश आले.
नगरसेवक ॲड. अमोल कापरे म्हणाले, “सत्यपुरम चौकातील वाहतूक कोंडी ही परिसरातील हजारो नागरिकांसाठी डोकेदुखी बनली होती. वाहतूक सिग्नल ही येथील अत्यावश्यक गरज होती. त्यासाठी आम्ही गेल्या वर्षभर सातत्याने पाठपुरावा केला. प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.”
स्थानिक नागरिक दिपक वाडकर म्हणाले, “या प्रश्नावर नागरिकांनी लेखी निवेदन देऊन आवाज उठविला होता. त्याची दखल घेत वाहतूक विभागाने प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली आणि समस्या समजून घेतली. आता लवकरच वाहतूक सिग्नल कार्यान्वित होऊन दररोजच्या वाहतूक कोंडीपासून नागरिकांची कायमची सुटका होईल, अशी अपेक्षा आहे.”
वाहतूक विभागाच्या या निर्णयामुळे सत्यपुरम चौकातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागण्याबरोबरच अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.

