
२८ वर्षांपासून रस्ता रुंदीकरण रखडले; ससाणे नगरकरांचा संताप
१९८७ च्या विकास आराखड्यात ३० मीटर रस्ता, प्रत्यक्षात मात्र फुटपाथ-दुभाजकाचा अभाव; २०१२ मधील गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतरही प्रशासनाला जाग नाही
हडपसर : ससाणे नगर मुख्य रस्त्याचे रुंदीकरण गेली २८ वर्षे रखडले असून, १९८७ च्या विकास आराखड्यात ३० मीटर रुंद प्रस्तावित असलेला रस्ता आजही केवळ कागदावरच असल्याचे चित्र आहे. फुटपाथ आणि दुभाजक नसल्याने शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
ससाणे नगर हा झपाट्याने विकसित झालेला परिसर असला तरी मुख्य रस्त्याची अवस्था मात्र कायम बिकट आहे. दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक, वारंवार होणारी कोंडी आणि पादचाऱ्यांसाठी सुरक्षित मार्ग नसल्याने अपघातांचा धोका वाढला आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, २०१२ मध्ये या रस्त्यावर भरधाव वाहनाच्या धडकेत एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही या मार्गावर अनेक अपघात घडले आहेत. मात्र, या गंभीर घटनांमधूनही प्रशासनाने कोणताही धडा घेतला नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
रस्ता रुंदीकरण, फुटपाथ आणि दुभाजक उभारण्यासाठी नागरिकांनी अनेक वेळा आंदोलने केली, लेखी निवेदने दिली आणि सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, पुणे महापालिकेचा मुख्य पथ विभाग, बांधकाम विभाग तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली.
स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, दर पाच वर्षांनी निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवक आणि आमदार रस्ता रुंदीकरण, विकसित रस्ते आणि पूल उभारण्याची आश्वासने देतात. मात्र निवडणूक संपल्यानंतर ही आश्वासने हवेत विरतात आणि नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न पुन्हा दुर्लक्षित राहतो.
आजही ससाणे नगर मुख्य रस्त्यावर शाळकरी विद्यार्थ्यांसह हजारो नागरिकांना वाहनांच्या गर्दीतून मार्ग काढावा लागतो. त्यामुळे प्रत्येक दिवस हा जीव धोक्यात घालून प्रवास करण्यासारखा ठरत आहे.
१९८७ च्या विकास आराखड्यातील ३० मीटर रस्त्याची तातडीने अंमलबजावणी करून रस्ता रुंद करावा, दोन्ही बाजूंना फुटपाथ, मध्यभागी दुभाजक उभारावा आणि वाहतूक सुरक्षित करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी ससाणे नगरकरांनी केली आहे. तसेच “आणखी किती अपघात झाल्यानंतर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जागे होणार?” असा संतप्त सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.

