मंतरवाडी–कोंढवा रस्त्यावर १५ दिवसांपासून सांडपाण्याचा विळखा

मंतरवाडी–कोंढवा रस्त्यावर १५ दिवसांपासून सांडपाण्याचा विळखा

रस्त्यावर साचलेल्या सांडपाण्यातून वाहनचालकांची कसरत; सार्वजनिक आरोग्य धोक्यात

पिसोळी: मंतरवाडी–कोंढवा रस्त्यावरील पिसोळी येथे धर्मावत पेट्रोल पंपाजवळील ड्रेनेज चेंबर तुंबल्याने गेल्या १५ दिवसांपासून सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात घाण पाणी साचले असून वाहनचालक, पादचारी आणि स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

रस्त्यावर साचलेल्या सांडपाण्यातून मार्ग काढताना दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेकदा भरधाव वाहनांमुळे सांडपाणी अंगावर उडाल्याने वाहनचालक आणि नागरिकांमध्ये शाब्दिक वाद, तू-तू, मैं-मैं होत असून वातावरण तणावपूर्ण बनत आहे.

सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांची उत्पत्ती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यात ही समस्या अधिक तीव्र होत असल्याने साथीचे आजार पसरण्याचाही धोका निर्माण झाला आहे.

स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप केला आहे. ड्रेनेज विभागाने तातडीने चेंबरची सफाई करून सांडपाण्याचा प्रवाह थांबवावा, रस्त्यावर साचलेले घाण पाणी हटवावे आणि समस्या कायमस्वरूपी सोडवावी, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच या प्रकाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात येत आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!