
हडपसर-मांजरीत पल्स पोलिओ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
९० पोलिओ बूथवर यशस्वी लसीकरण; महिनाभराच्या नियोजनाला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद
पुणे : पुणे महानगरपालिका हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. क्षेत्रात उभारण्यात आलेल्या ९० पोलिओ बूथवर एकूण १६ हजार १८८ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी जवळपास एक महिनाभर नियोजनबद्ध तयारी करण्यात आली होती. नागरिकांमध्ये जनजागृती, बूथचे नियोजन, कर्मचारी नियुक्ती आणि लसीकरणाची प्रभावी अंमलबजावणी यामुळे मोहिमेला अपेक्षित यश मिळाले.
या मोहिमेत लोकप्रतिनिधींनीही सक्रिय सहभाग नोंदविला. त्यांच्या सहकार्यामुळे अधिकाधिक पालकांनी आपल्या बालकांना पोलिओचे डोस देण्यासाठी बूथवर आणले.
मोहिमेच्या यशासाठी माननीय आरोग्य अधिकारी, सहाय्यक आरोग्य अधिकारी, लसीकरण विभाग, परिमंडळ वैद्यकीय अधिकारी, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी, सर्व वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी तसेच स्वयंसेवकांनी समन्वयाने काम केले. सर्वांच्या एकत्रित नियोजनामुळे आणि मेहनतीमुळे ही मोहीम यशस्वी ठरली.
“हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ९० पोलिओ बूथवर एकूण १६ हजार १८८ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस देण्यात आली. नागरिकांनी मोहिमेला उत्कृष्ट प्रतिसाद दिला. महिनाभराच्या नियोजनानंतर सर्व संबंधित अधिकारी, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवकांच्या सहकार्यामुळे ही मोहीम यशस्वीपणे पार पडली,” अशी माहिती हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य अधिकारी डॉ. स्वाती घनवट यांनी दिली.

