आदेश कागदावर, खड्डे रस्त्यावर! सय्यद नगर–ससाणे नगर मार्गावर नागरिक त्रस्त

आदेश कागदावर, खड्डे रस्त्यावर! सय्यद नगर–ससाणे नगर मार्गावर नागरिक त्रस्त

महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष; खड्डे बुजवून रस्ता दुरुस्ती कधी? नागरिकांचा संतप्त सवाल

हडपसर,
प्रभाग क्रमांक ४० मधील सय्यद नगर रेल्वे क्रॉसिंगजवळील सय्यद नगर ते ससाणे नगर भुयारी मार्गावरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिक आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत. दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक असलेल्या या मार्गाची दुरवस्था झालेली असतानाही महापालिकेच्या पथ विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून, दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. खड्डे चुकविताना अपघाताचा धोका वाढला असून वाहनांचेही नुकसान होण्याची शक्यता आहे.

महापालिका प्रशासनाकडून शहरातील खड्डे बुजविण्याबाबत वरिष्ठ पातळीवरून आदेश देण्यात आले असतानाही या रस्त्यावरील परिस्थिती कायम असल्याने “महापालिकेचे आदेश नेमके कोणासाठी आणि त्यांची अंमलबजावणी कधी होणार?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

“नागरिकांनी कर भरायचा, मात्र त्याच नागरिकांना खड्ड्यांतून प्रवास करावा लागणार का? रस्त्यांची पाहणी करण्यासाठी अधिकारी प्रत्यक्ष घटनास्थळी कधी येणार?” असा संतप्त प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

रस्त्याच्या कामाची गुणवत्ता, देखभाल आणि दुरुस्ती याबाबत संबंधित विभागाने जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे. केवळ कागदोपत्री आदेश काढून प्रश्न सुटणार नाही. प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून पाहणी करून तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

याबाबत मीना थोरात, शरफत पानसरे आणि नाझीम सय्यद यांनी नागरिकांच्या वतीने प्रश्न उपस्थित करत, “सय्यद नगर ते ससाणे नगर भुयारी मार्गावरील खड्डे तातडीने बुजविणार कधी? रस्त्याची कायमस्वरूपी आणि दर्जेदार दुरुस्ती कधी होणार?” असा थेट सवाल महापालिका प्रशासनाला केला आहे.

महापालिका पथ विभागाने तातडीने या रस्त्याची पाहणी करून खड्डे बुजवावेत, रस्त्याची दर्जेदार दुरुस्ती करावी आणि कामाच्या गुणवत्तेची तपासणी करावी. तसेच आदेश देऊनही दुरुस्तीला विलंब होत असल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

आता आश्वासन नव्हे, प्रत्यक्ष कृती हवी. नागरिकांना सुरक्षित रस्ता मिळणे ही सुविधा नसून प्रशासनाची मूलभूत जबाबदारी आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!