कात्रज-कोंढवा रोडवर रक्तरंजित थरार; तरुणाचा दगडाने ठेचून खून,

कात्रज-कोंढवा रोडवर रक्तरंजित थरार; तरुणाचा दगडाने ठेचून खून,

पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर परिसरात मद्यप्राशनानंतर झालेल्या वादातून एका तरुणाच्या डोक्यात दगडाने वार करून खून केल्याची घटना रविवारी (४ ऑक्टोबर) सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

राजकुमार अंबाजी सनगुंडे असे मृत तरुणाचे नाव असून, याप्रकरणी तुषार वाल्हेकर (वय २९, रा. गोकुळनगर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोकुळनगर येथील एअरकिंग हॉटेलसमोरील मोकळ्या जागेत ही घटना घडली. राजकुमार सनगुंडे आणि तुषार वाल्हेकर हे एकमेकांच्या परिचयातील होते. दोघेही अनेकदा एकत्र असायचे. घटनेच्या आदल्या दिवशीही दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे.

रविवारी दोघांनी मद्यप्राशन केल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर त्यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी तुषार वाल्हेकर याने राजकुमारच्या डोक्यात दगडाने वार केल्याचा आरोप आहे. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने राजकुमारचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांनी तुषार वाल्हेकर याला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे घटनेबाबत चौकशी सुरू आहे.

राजकुमार आणि तुषार यांच्यात नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला, याचा तपास पोलीस करत आहेत.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )
error: Content is protected !!