
ससाणेनगर कॅनॉल पुलावरील धोकादायक कामाविरोधात शिवसेनेचे आंदोलन
विजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ठेकेदार व प्रशासनाचा निषेध; आठ दिवसांत सुधारणा न झाल्यास उपोषणाचा इशारा
हडपसर,
हडपसर-ससाणेनगर रस्त्यावरील हिंगणे मळा येथील कॅनॉलवरील ओव्हरब्रिज (पूल) बांधकाम संथ गतीने सुरू असून, कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा माजी नगरसेवक विजयभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी ठेकेदार आणि पुणे महानगर पालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, पुलाच्या कामाच्या ठिकाणी आवश्यक बॅरिकेड्स, सूचना फलक, कामाचे अधिकृत माहिती फलक, वाहतूक सुरक्षा रक्षक किंवा वाहतूक नियमनाची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. कामामुळे रस्ता अरुंद झाल्याने दररोज वाहतूक कोंडी होत असून वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. एखादा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.
यावेळी विजयभाऊ देशमुख म्हणाले, “उन्हाळ्यात कालव्यात पाण्याचा प्रवाह नसताना काम सुरू केले नाही. मात्र पावसाळ्यात कालव्यात पाणी असताना पुलाचे काम सुरू करण्यात आले. हा नियोजनाचा अभाव असून नागरिकांच्या जीवाशी खेळ करण्याचा प्रकार आहे. कामाच्या ठिकाणी सुरक्षेचे कोणतेही निकष पाळले जात नाहीत. येत्या आठ दिवसांत सर्व सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, तर शिवसेनेच्या वतीने याच ठिकाणी बेमुदत उपोषण करण्यात येईल.”
या आंदोलनात ज्येष्ठ शिवसैनिक रामभाऊ माने, उपशहर चिटणीस गौरव गायकवाड, उपविभाग प्रमुख जितू कदम, सुहास वाडेकर, बाबू काळे, अमोल अवचिते, आकाश अलकुंटे, गौरव मोरे, जयेश अलकुंटे, समर्थ पोतदार, ओंकार तावरे, साहिल बोटे, वेद सोनवणे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

