
शिक्षक विद्यार्थ्यांबरोबर समाज घडवतात – प्राचार्य साळुंखे
पुणे : विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्यात संस्कार, मूल्ये, जिज्ञासा आणि सामाजिक जाणिवा रुजविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य शिक्षक करीत असतात. शिक्षकांच्या योगदानातूनच सक्षम, संवेदनशील आणि जबाबदार पिढी घडते. त्यामुळे शिक्षक हे विद्यार्थ्यांबरोबरच समाज घडविण्याचेही कार्य करतात, असे प्रतिपादन स्वामी विवेकानंद संस्थेचे प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी केले.
शिरूर येथे पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षिका संघ, पुणे जिल्हा सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक संघ आणि पुणे जिल्हा उच्च माध्यमिक शिक्षक संघ कार्यकारिणीच्या वतीने जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्राचार्य अभयकुमार साळुंखे आणि सीईओ कौस्तुभ गावडे यांच्या हस्ते संजय काशिनाथ बालगुडे आणि राजेंद्र हरिभाऊ सोनवणे यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी टीडीएफचे अध्यक्ष जी. के. थोरात, कार्यवाह के. एस. ढोमसे, पै. किरण साकोरे, स्वाती घावटे, शिवाजीराव कामथे, डेवलप्ड नेशन्स लॉ न्यूजचे निवासी संपादक डॉ. अशोक बालगुडे यांच्यासह पुरस्कारार्थी व शिक्षक उपस्थित होते. संत लिंगनाथ स्वामी माध्यमिक विद्यालय, भोंगवलीचे मुख्याध्यापक अंकुश हरिभाऊ सोनवणे, मुरारबाजी देशपांडे विद्यालय, वाटर हिंगेचे मुख्याध्यापक संजय रामभाऊ पगारे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक रोहिदास नारायण जगताप आणि दादाजो कोंडदेव विद्यालय, वांगणीचे मुख्याध्यापक नितीन विष्णु रांजणे उपस्थित होते.
कौस्तुभ गावडे म्हणाले, “शिक्षकांचे कार्य वर्गखोलीपुरते मर्यादित नसते. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देतानाच त्यांच्या भविष्यातील वाटचालीला दिशा देण्याचे काम शिक्षक करतात. गुणवंत शिक्षकांचा सन्मान हा त्यांच्या कार्याचा गौरव असून, समाजातील शिक्षकांविषयीचा आदर अधोरेखित करणारा आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

