गौरी पूजनाच्या गर्दीत हडपसर ठप्प; वाहतूक नियोजनाचा अभाव

गौरी पूजनाच्या गर्दीत हडपसर ठप्प; वाहतूक नियोजनाचा अभाव

गणेश विसर्जनाच्या वाहनांची भर; प्रमुख चौकांत लांबच लांब रांगा, नागरिकांचा वेळ आणि इंधन वाया

हडपसर : गौरी पूजन आणि गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवसानिमित्त शुक्रवारी सायंकाळी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याने हडपसर परिसरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण आला. गौरी पूजनासाठी होणारी ये-जा आणि घरगुती गणपती विसर्जनासाठी निघालेल्या वाहनांमुळे अनेक प्रमुख मार्गांवर वाहतुकीचा वेग मंदावला.

हिंगणे मळा कॅनाल, एसबीआय चौक, नवनाथ चौक-ससाणेनगर, रवी पार्क भुयारी मार्ग, सय्यदनगर रेल्वे क्रॉसिंग, वाडकर मळा चौक, श्रीराम चौक-उद्योगनगर, भुजबळ चौक-सातव नगर आणि महात्मा फुले चौक-सातव नगर येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

कोंडीचा थेट फटका नागरिकांना

सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत रस्त्यावर अडकलेल्या वाहनांमुळे कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांचा प्रवास लांबला. महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावर अधिक वेळ थांबावे लागले. वारंवार ब्रेक-स्टार्ट करावी लागल्याने वाहनांचे इंधनही वाया गेले.

एका चौकातील वाहतूक विस्कळीत झाल्याचा परिणाम लगतच्या रस्त्यांवर झाला. त्यामुळे अंतर्गत मार्गांवरही वाहनांची गर्दी वाढली. गणेश विसर्जनासाठी कुटुंबासह निघालेले नागरिक कोंडीत अडकले; तर आपत्कालीन सेवांच्या वाहनांना मार्ग मोकळा ठेवण्याचे आव्हान निर्माण झाले.

गर्दीचा अंदाज घेऊन नियोजन आवश्यक

गौरी पूजन आणि गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवसाची गर्दी लक्षात घेता सायंकाळच्या वेळेस वाहतुकीवर अतिरिक्त ताण येणार हे अपेक्षित होते. त्यामुळे हडपसर आणि काळे पडळ वाहतूक विभागाने संयुक्तपणे प्रमुख चौकनिहाय नियोजन करणे गरजेचे होते.

आगामी विसर्जनाच्या दिवसांत गर्दी वाढण्याची शक्यता असल्याने प्रमुख चौकांवर अतिरिक्त मनुष्यबळ, विसर्जन मार्गांवर वाहतूक नियंत्रण आणि आवश्यकतेनुसार पर्यायी मार्गांची व्यवस्था करावी. कोंडी झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा गर्दीच्या वेळेचा अंदाज घेऊन आधीच रस्त्यावर वाहतूक नियोजन करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )
error: Content is protected !!